आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी लोकसभेची : शिवसेनेत माझाच ‘आदेश’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दशरथ पाटील, दत्ता गायकवाड यांना उमेदवारी देताना स्थानिक पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले. लोकशाहीमार्गाने उमेदवाराची निवड केल्यानंतरही विजय मिळवता आला नाही. या पार्श्वभूमीवर आता फक्त माझाच ‘आदेश’ अंतिम असेल व मी देईल त्याला विजयी करण्याची जबाबदारी तुमची असेल, अशी रोखठोक भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली.

हॉटेल गेटवे येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत निवडक पदाधिकार्‍यांची बैठक शनिवारी झाली. सुरुवातीलाच कोणावर आरोप-प्रत्यारोप करण्याचा उद्देश नसून, पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी घरगुती बैठकीचे स्वरूप असेल असे सांगण्यात आले. समजलेल्या माहितीप्रमाणे ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांना कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले की, मागील दोन लोकसभा निवडणुकीत उमेदवार ठरवताना स्थानिकांचा मतप्रवाह चाचपण्यात आला. त्यांचे ज्या उमेदवाराबाबत एकमत झाले त्यांनाच तिकीट दिले.

प्रत्यक्षात त्या उमेदवारांना विजयी करण्यात स्थानिक पदाधिकारी अयशस्वी ठरले. त्यामागची कारणे मला व तुम्हाला माहीत आहेत. आताही उमेदवारीसाठी काही नावे समोर असली तरी आता अंतिम निर्णय माझाच असेल. बाळासाहेबांना लोकशाही भूमिका मान्य नव्हती. आदेश संस्कृतीप्रमाणेच शिवसेनेचे काम सुरू होते व शिवसैनिकही मनापासून त्या आदेशाचे पालन करीत आले. लोकशाहीमार्गाने उमेदवाराची निवड करूनही त्याचा लाभ होत नसल्यामुळे आता मी सांगेल त्याच उमेदवाराचे काम करून निवडून आणा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

नाशिक शिवसेनेचाच बालेकिल्ला
गेल्या दहा वर्षांत शिवसेनेची घसरण झाली असली तरी नाशिक हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. नावाला एक फडके तिकडे फडकतेय, असे सांगत त्यांनी मनसेलाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

इच्छुकांची वाढली घालमेल
ठाकरे यांनी उमेदवार निवडण्याचे अधिकार स्वत:कडे घेतल्यामुळे इच्छुकांची घालमेल वाढली आहे. उमेदवारीसाठी यंदा प्रथम मनसे नगरसेवक हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी प्रचारही सुरू केला. दरम्यान, ठाकरे यांनीही गोडसे हेच उमेदवार असतील, असे संकेत दिले होते. पुढे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही उमेदवारीबाबतच्या सुप्त इच्छेला मोकळे केले. उमेदवारीवरून स्पर्धा वाढत असताना नवीन चेहर्‍यांच्या रूपाने शिवाजी सहाणे, अजय बोरस्ते तर गेल्या वेळचे उमेदवार दत्ता गायकवाड यांचीही नावे चर्चेत आली. त्यातून पुन्हा गटबाजी वाढू नये म्हणून ठाकरे यांनी बैठक घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.