आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची सत्ता आल्यास सावरकरांचे स्मारक उभारू - उद्धव ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अंदमानमध्ये जितका प्राण तळमळला नसेल तेवढा आताच्या नाकर्त्या काँग्रेस सरकारचे काम बघून तळमळत असेल. 2014 मध्ये शिवसेनेची सत्ता आल्यास सावरकरांच्या याच जन्मभूमीत दिमाखदार स्मारक उभे करीन व याच स्मारकापुढे विदेशातून आलेले पर्यटक नतमस्तक होतील. हा खर्‍या अर्थाने सावरकरांचा गौरव असेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, कोल्हापूरमध्ये काही वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते सावरकर संमेलनाचे उद्घाटन झाले. आज माझ्या हस्ते नाशिकमध्ये झाले. याला घराणेशाही म्हणा किंवा आणखी काही. मी कोणाचीही पर्वा न करता पुढे जाणारच आहे. यशाची व्याख्या काय हे 2014 च्या निवडणुकीतून दाखवून देईन.

भगवा खांद्यावर घेऊन राज्य पिंजून काढणार आहे. सावरकर म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. मी त्यांचे जास्त साहित्य वाचले नाही. हिंदूंवर ब्रिटिशांनी केलेले अत्याचाराचे वर्णन ऐकून मी मध्यंतरी एक पुस्तक वाचता वाचता सोडून दिले. सावरकरांची सागरातील उडी लक्षात ठेवण्यापेक्षा त्यांचे विचार लक्षात ठेवा, अडचणीच्या काळात हेच विचार तारून नेतील, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

पाकला निमंत्रण कशाला
हिंदूंना अतिरेकी म्हणतात व घुसखोर अतिरेकी सापडल्यानंतरही पाकच्या भारतात आमंत्रण देतात, हे चाललेय तरी काय, असा सवाल ठाकरे यांनी कॉँग्रेस सरकारला केला. कोणी वाकड्या नजरेने पाहू नये यासाठीच हिंदूंना संघटित करण्याचे काम आपण करीत आहोत. चिथावणीखोर वक्तव्य करणार्‍या ओवेसीला एकतर हाकला किंवा भारतात निष्ठेने राहण्याची भाषा करणार्‍या अजमेर शरीफला तरी सन्मानित करा, असे उद्धव म्हणाले.

साहित्य संशोधनाची गरज : पाठक
‘सावरकरांचे साहित्य म्हणजे आकाशाचा दीपोत्सव आहे. त्याचा नव्याने अभ्यास व संशोधन होण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाचे अध्यक्ष प्रा. यशवंत पाठक यांनी केले. घरात यंत्र आले म्हणजे आधुनिकता येत नाही. ‘मी आणि निसर्ग, माझ्या जाणिवेच्या कक्षा विस्तारत जेव्हा निसर्गाशी संवाद करतो तेव्हा मला विज्ञानाचा आवाका लक्षात येतो ही आधुनिकता आहे,’ अशी विज्ञानाची व्याख्या सावरकरांनी केली आहे, असेही पाठक सांगितले.

उद्धव ठाकरे भावी मुख्यमंत्री : पोंक्षे
शरद पोंक्षे यांनी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. ठाकरे असल्यामुळे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बिनधास्त बोलेन, असे सांगत त्यांनी कॉँग्रेसवर टीका केली. कॉँग्रेसवाले फायदा असेल तरच महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करतात. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सरदाराप्रमाणे कणखर काम करणे अपेक्षित असतानाही तसे घडत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.