आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi

उद्धव ठरविणार आज निवडणूक रणनिती,लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराचा दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आमदार बबनराव घोलप यांना सत्र न्यायालयाने बजावलेली शिक्षा, ‘एकला चलो रे’ म्हणत भाजपकडून केली जाणारी नरेंद्र मोदींची फलकबाजी, भुजबळांसारख्या तगड्या उमेदवारासमोर आव्हान निर्माण करण्यासाठी
आवश्यक असणारी रणनीती, मनसेचे गारुड जनतेच्या डोक्यातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक प्रयत्न आणि प्रचाराचे नियोजन या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी (दि. 24 मार्च) शहरात दाखल होत आहेत.या दौर्‍यात ते महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांसमवेत दुपारी 12 वाजता हॉटेल सूर्या येथे बैठक घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आता विविध पक्षांच्या प्रमुखांचे दौरे सुरू झाले असून, त्यात शिवसेना पक्षाने आघाडी घेतली आहे. सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी नाशिक दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते प्रमुख पदाधिकार्‍यांसमवेत बैठक घेणार आहेत. त्यात जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक आणि शहरातील काही महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. हॉटेल सूर्या येथील या बैठकीत प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच, युतीसंदर्भातील जिल्ह्यातील वातावरण, हे वातावरण अधिक सुकर करण्यासाठी आवश्यक असणारे प्रयत्न आणि विरोधकांच्या राजकीय चाली याविषयीचीही माहिती ते घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
या वेळी सहाही विधानसभा मतदारसंघांतील बूथनिहाय यंत्रणेचा आढावा उद्धव ठाकरे हे घेणार असून, निवडणूक प्रचारातील अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार आहे.


मोदींची नाशकात सभा?
नरेंद्र मोदी यांची दिंडोरीसह नाशिक मतदारसंघातदेखील सभा व्हावी, म्हणून शिवसेनेच्या वतीनेही जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीदेखील दोन्ही मतदारसंघांत 18 एप्रिल रोजी सभा होणार असल्याची शक्यता काही सूत्रांनी वर्तविली आहे. नाशिक जिल्ह्यात युतीला बळकटी मिळावी, यासाठी शिवसेनेकडून हे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

घोलपांविषयी निर्णय..
बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपात दोषी ठरवत शिवसेनेचे देवळालीतील आमदार बबन घोलप यांना तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सर्वोच्च् न्यायालयाने सुनावली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी घोलप यांची उमेदवारी शिवसेनेने यापूर्वीच जाहीर केली आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाली, तर निवडणूक लढण्यास अपात्र ठरणारा निकाल सर्वोच्च् न्यायालयाने दिला असल्याने घोलप यांची उमेदवारी संकटात आली आहे. शिवाय, त्यांची आमदारकीही रद्द होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे सोमवारी नाशकात येणार असल्याने घोलप यांच्या उमेदवारीबाबत येथे पदाधिकार्‍यांसमवेत होणार्‍या विशेष बैठकीत चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच, या जागेसाठी शिर्डीचेही काही कार्यकर्ते भेटण्याची शक्यतादेखील सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.