आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Nashik, Maharashtra Sadan

महाराष्ट्र सदनाचे लॉजिंग बोर्डिंग करा; उद्धव ठाकरे यांचा टीकाकारांना टोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे नाशिक कनेक्शन सर्वश्रुत आहे. या सदनाच्या बांधकामात झालेला भ्रष्टाचार दडपवण्यासाठीच विरोधकांनी हीन पद्धतीने राजकारण करून शिवसेनेवर आरोप करणे सुरू केले आहे,’ असा पलटवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्र सदन हे दिमाखदार असावे, अशी आमची अपेक्षा आहे. तसे जर करता येत नसेल तर मग या इमारतीचे लॉजिंग बोर्डिंगच करून टाका, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेना खासदारांनी बुधवारी महाराष्ट्र सदनातील कॅँटीनमध्ये एका रोजेदाराच्या तोंडात पोळी कोंबण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून टीकेची झोड उठली आहे. त्यावर उद्धव म्हणाले की, महाराष्ट्र सदन सुरुवातीपासूनच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. किरीट सोमय्या यांनी या इमारतीच्या बांधकामात झालेल्या घोटाळ्याची माहिती उघड केली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. काही मराठी कलाकारांनाही सदनात राहण्याची परवानगी नाकारण्यात आली. दुसरीकडे परप्रांतीय खासदारांची मात्र सोय केली जाते, त्यामुळे हा वाद उद्भवला होता, असे उद्धव म्हणाले.

धनगर समाज आरक्षणाला पाठिंबा
धनगर समाज आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवत उद्धव म्हणाले की, ‘या समाजाच्या आरक्षणाची मागणी रास्त आहे. ‘र’ चा ‘ड’ झाल्याने हा समाज सवलतींपासून वंचित राहिला. हा बदल कोणी केला ते बघावे लागेल.
मुस्लिमविरोधी नाही
शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असला तरीही तो मुस्लिमविरोधी नाही. तसे असते तर आमच्या खासदारांनी अजमेर शरीफला जाऊन धर्मगुरूंचा सत्कार केलाच नसता. आमच्या पक्षात असंख्य मुस्लिम कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. परंतु लोकसभेतील आमचे यश बघवत नसल्याने विरोधक हीन पद्धतीने आमची प्रतिमा अशा पद्धतीने मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

आमदार गावित शिवसेनेत
राष्ट्रवादीचे माजी मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू व समाजवादी पक्षाचे आमदार राजेंद्र गावित यांनी गुरुवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.