आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Shiv Sena, Bhujbal, Lok Sabha Election

भुजबळांबरोबर सेटिंग नाही, उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - निवडणुकीच्या नियोजनासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हॉटेल सूर्या येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात निवडक पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले होते.मला मॅनेज करण्याची हिंमत अद्याप कोणातही नाही, असे सांगत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, निवडणूक काळात प्रत्येक ठिकाणी सभा घेणे शक्य होत नाही. त्याप्रमाणे गेल्या लोकसभा निवडणुकीत मला सभा घेता आली नव्हती. परंतु, त्याचा सोयीस्कर अर्थ काढत विरोधकांनी आपण भुजबळांबरोबर सेटिंग केल्याची अफवा पसरवली. अशा अफवांना शिवसैनिक भीक घालत नाहीत. बाळासाहेब हे समस्त शिवसैनिकांचे दैवत आहेत आणि या दैवताला तुरुंगात टाकण्याचा विचार भुजबळांनी केला होता. अशा भुजबळांना जागा दाखविण्याची हीच वेळ आहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले. दशरथ पाटील यांच्यापासून पराभवाची मालिका सुरू झाली होती. ही मालिका खंडित करून आता विजयाची मालिका सुरू करा, असे आवाहनही त्यांनी केले. व्यासपीठावर शिवसेनेचे उपनेते सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, आमदार दादा भुसे, आमदार अनिल कदम, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, महापालिकेचे विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते.


रेटारेटीत स्वागत; गुप्ततेचा बाऊ
शिवसेनेच्या निवडक पदाधिकार्‍यांची बैठक असली तरीही शिवसैनिक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. त्यामुळे हॉटेल सूर्यामध्ये एकच गर्दी झाली होती. ओळखपत्र असलेल्या पदाधिकार्‍यांनाच सुरुवातीला बैठकस्थळी प्रवेश दिला जात होता. त्यामुळे वादावादीही होत होती. त्यामुळे सर्वच पदाधिकार्‍यांना बैठकीला प्रवेश देण्यात आला. उद्धव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर माध्यम प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्या गर्दीतून ठाकरे यांना वाट काढणेही मुश्कील झाले होते. या रेटारेटीतच माजी महापौर विनायक पांडे आणि विलास शिंदे यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. ही बैठक गोपनीय असल्याचे सांगितले जात होते. उद्धव यांनीही दुजोरा दिला. परंतु, उपस्थित शिवसैनिक मोबाइलमध्ये ठाकरे यांचे भाषण चित्रित करीत होते. त्यामुळे गोपनीयतेचा बाऊ कशासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला.


माझ्यावर विजयची जबाबदारी
उमेदवारीवरून शिवसेनेत हेमंत गोडसे व विजय करंजकर यांच्यात रस्सीखेच सुरू होती. त्यात गोडसे यांनी बाजी मारली. सोमवारी झालेल्या बैठकीत प्रास्ताविक करताना जिल्हाप्रमुख करंजकर हे भावुक झाले. परंतु, काही क्षणातच त्यांनी स्वत:ला सावरत गोडसे यांना विजयी करून देण्याचा शब्द दिला. उद्धव ठाकरे यांनी हाच धागा पकडत विजयची जबाबदारी आता माझ्यावर आहे आणि हेमंतच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावर आहे, असे सांगत टाळ्यांची दाद मिळविली.


केंद्रातही युती आहे ना?
लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा देत भारतीय जनता पक्ष केवळ मोदींचाच प्रचार करीत असल्याची चर्चा सर्वत्र आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ‘केंद्रात युती आहे ना’, असा सवाल करीत आता हेमंत गोडसेंचाही प्रचार करा, असा उपरोधिक टोला भाजपच्या पदाधिकार्‍यांना लगावला. भाजपच्या शिष्टमंडळात उपमहापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, प्रदेश चिटणीस सीमा हिरे, विजय साने, बाळासाहेब सानप यांचा समावेश होता.


यापुढे येवल्यात जाऊ नका
काही दिवसांपूर्वी येवला येथे भुजबळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास रिपाइंचे प्रकाश लोंढे उपस्थित होते. याची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी रिपाइंच्या शिष्टमंडळास आता येवल्याला जाऊ नका, असा प्रेमाचा सल्ला दिला. शिष्टमंडळात लोढेंसह शंकर काकळीज, विश्वनाथ काळे, प्रियकीर्ती त्रिभुवन, फकिरा जगताप, अमोल पगार, पवन क्षीरसागर, माधुरी भोळे, गुंफाताई भदरगे, विजया केदारे, प्रीती भालेराव, सुरेखा भंडारे आदी उपस्थित होते.


शेतकरी व उद्योजकांची भेट
उद्धव ठाकरे यांची युतीच्या पदाधिकार्‍यांबरोबरच काही उद्योजक आणि शेतकर्‍यांनीही भेट घेतली. सिन्नर तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी या वेळी आपले झालेल्या नुकसानीसंदर्भात गार्‍हाणे मांडले. उद्योजकांमध्ये संतोष मंडलेचा, दिग्विजय कापडिया, आर्किटेक्ट असोसिएशनचे नीलेश चव्हाण, सतीश शहा, लघुउद्योग भारतीचे कुलकर्णी, बार असोसिएशनचे अँड. का. का. घुगे आदींनी या वेळी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

उद्धव उवाच :
* चिखलीकर प्रकरणाचा चिखलही घोटाळेबहाद्दरांना फासा.
* मोदींच्या रूपाने ‘एनडीए’ला चेहरा मिळाला.
* मोदी लाटेचे परिवर्तन मतांमध्ये करावे.
>मातोश्री आणि भुजबळ यांच्यात सेटिंग असल्याची चर्चा घडवून आणली जात असली तरीही त्यात कवडीमात्र तथ्य नाही, असे स्पष्ट करताना बाळासाहेबांना तुरुंगात टाकण्याचा विचार करणार्‍याला मी कसा मॅनेज होऊ शकतो, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. निवडणूक काळात शिवसैनिकांनी एकत्र येऊन भुजबळांचे घोटाळे बाहेर काढावेत, असे आवाहनही त्यांनी केले.