आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unauthorized Connection With The Theft Of Water At Nashik

हॉटेल साई पॅलेसकडून पाणीचोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- महामार्गालगतच्या हॉटेल साई पॅलेस या बड्या हॉटेलकडून अनधिकृत कनेक्शन घेऊन पाण्याची चोरी होत असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीत आढळले. या प्रकरणी संबंधितांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे.

महामार्गालगत असलेल्या हॉटेल साई पॅलेसने अनधिकृतपणे दोन इंची नळकनेक्शन घेतल्याचे रविवारी निदर्शनास आले. दोन दिवसांपूर्वीच सिडको विभागीय कार्यालयाकडे याविषयी तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार, सिडको कार्यालयातील कर्मचार्‍यांनी शनिवारी (दि. 18) तेथे जाऊन त्याची माहिती घेऊन याबाबत खात्री केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी रविवारी (दि. 19) विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पाहणी केली असता, रात्रीतून हे कनेक्शन बंद करून पुरावे नष्ट केल्याचे आढळून आल्याचे गोसावी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

महापालिकेकडील संख्येत तफावत : हॉटेल, व्यावसायिक दुकानदार आणि औद्योगिक वसाहतीतील उद्योग यासंदर्भात महापालिका आणि विक्रीकर विभागाकडे असलेल्या संख्येत खूप मोठी तफावत आहे. महापालिकेच्या खाती शहरात 344 हॉटेल्स आहेत, तर विक्रीकर विभागाकडे 15 हजार 344, व्यावसायिक दुकानदार महापालिकेकडे 44 हजार, तर विक्रीकरकडे एक लाख 28 हजार तसेच महापालिकेकडे उद्योग 2800, तर औद्योगिक वसाहतीकडे 3750 इतकी नोंद आहे. यामुळे नोंद नसलेले हॉटेल्स, उद्योग व व्यावसायिक दुकानदारांची पाणीपट्टी, घरपट्टी जाते कुठे, असा प्रश्न विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला होता. त्यावर अद्याप विविध कर विभागाकडून कार्यवाही होऊ शकली नाही, हे विशेष.

कामगाराची तक्रार : हॉटेलमध्ये बागकाम करणार्‍या महेश साळके याने त्यास वेतन न दिल्याने याबाबत पालिकेकडे तक्रार केली. मात्र, तीन दिवस उलटूनही या तक्रारीची दखल न घेतल्याने त्याने नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी पालिकेच्या अधिकार्‍यांना बोलावून संबंधित ठिकाणी खोदकाम करायला लावले असता मुख्य जलवाहिनीलाच पाइप जोडल्याचे निदर्शनास आले.

आम्ही चोरी केली नाही
आम्ही बोअरवेलच्या पाण्याचा उपयोग करतो. तेव्हा पाणी चोरण्याचा प्रश्नच नाही. उद्यानासाठीदेखील आम्ही बोअरवेलचेच पाणी वापरतो. यामुळे अधिकार्‍यांचे म्हणणे खोटे आहे. संतोष खारगे, व्यवस्थापक, हॉटेल साई पॅलेस

पाणीचोरी मी पाहिली
हॉटेलच्या व्यवस्थापनाकडून पाणीचोरी केली जाते हे मी स्वत: पाहिले होते. त्यांच्यावर कारवाई व्हावी. महेश साळके, तक्रारदार

गुन्हे दाखल करा
याचसंदर्भातील विषय सभागृहात यापूर्वीच मांडला आहे. या हॉटेल व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. मागील 25 वर्षांचा हिशेब घेऊन महसूल वसूल केला पाहिजे. सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेता


कडक कारवाई करावी
पालिकेचे पाणी चोरून वापरणार्‍या हॉटेलचालकांवर कडक कारवाई झाली पाहिजे. जेणेकरून पालिकेचा कर बुडविणार्‍यांना चाप बसू शकतो. लक्ष्मण जायभावे, नगरसेवक

दंड करणार
साई पॅलेस हॉटेलने पाण्याची चोरी केल्याचे उघड झाल्याने व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येऊन संबंधितांकडून 100 पट दंड वसूल करू. आर. आर. गोसावी, विभागीय अधिकारी, सिडको

साई पॅलेस हॉटेलचा चोरून पाणी घेत असल्याचा प्रकार उघडकीस आणताना नगरसेवक लक्ष्मण जायभावे. समवेत नागरिक. इन्सेटमध्ये मुख्य जलवाहिनीस जोडलेला पाइप .