आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजीबाजारातील अाेट्यांवरही अनधिकृत बांधकामे, पाेटभाडेकरू टाकून प्रशासनाला अाव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळावी, या हेतूने महापालिकेने शहराच्या सहा विभागांत दोन हजारांहून अधिक गाळे उभारले आहेत. मात्र, त्यातील बहुतांश गाळे अाजघडीला रिकामे असल्याने पालिकेच्या उत्पन्नावर त्याचा माेठा परिणाम होत आहे. तर अनेक ठिकाणी महापालिकेच्या मार्केटमधील आेट्यांवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करून त्याला लाखो रुपयांमध्ये विकले जात आहे. शहरातील कपड्यांचे मार्केट म्हणून आेळख असलेल्या तिबेटियन मार्केटजवळील महापालिकेच्या भाजीमार्केटमधील आेट्यांवर काही व्यावसायिकांनी अशाप्रकारे अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारी आहेत. तर सिडकोतील पवननगर परिसरात असलेल्या भाजी मंडईत जुने नाशिक परिसरातील महात्मा फुले भाजी मंडईतदेखील काही व्यापाऱ्यांनी आेट्यांवरच मोठमोठी दुकाने थाटून अशाप्रकारे व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, या व्यापाऱ्यांकडून महापालिकेला आेट्यांचे भाडेशुल्क नियमित दिले जाते असे नाहीच, परिणामी अनेकांकडून लाखो रुपयांचे भाडेशुल्क येणे थकित असल्याचेही समोर आले आहे.
अधिकाऱ्यांनामाहिती, तरीही खुलेअाम अतिक्रमणाचे धारिष्ट्य
महापालिकेच्या आेट्यांवर अनधिकृत बांधण्यात आलेल्या या गाळ्यांची आजही कागदोपत्री नोंद आहे. तर महापालिकेच्या विविध कर विभागांना या अवैध बांधकामांबाबत माहितीही अाहे. मात्र, असे असतानाही या गाळ्यांची परस्पर भाडेकरूंना देवाण-घेवाण हाेत असताना संबंधित अधिकारी मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

सिडकाेतील मंडईत शुकशुकाट, अतिक्रमणे मात्र मोकाट
इंदिरानगरयेथील सावरकर चौकात अनधिकृत भाजीविक्रेत्यांचा सुळसुळाट असून, तब्बल ७० ते ८० विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे जवळच असलेल्या कृष्णकांत भाजीबाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असून, या मंडईतील विक्रेत्यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार सुरूच असून, अधिकृत भाजीबाजारातील विक्रेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

असेही अनधिकृत बांधकाम; पालिका अधिकारी निद्रितावस्थेच
पूर्व विभागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयालगत असलेल्या कथडा मार्केटमधील एका गाळाधारकाने रुग्णालयाच्या कॅन्टीनसाठी आरक्षित असलेल्या जागेवर चक्क फॅब्रिकेशनचा व्यवसाय थाटला आहे. विशेष म्हणजे, त्याने अाता फॅब्रिकेशनच्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी रुग्णालयातील रॅम्प, शौचालय तसेच शेजारच्या डॉ. आंबेडकर उद्यानातील जागेवरदेखील अतिक्रमण केले आहे. या सर्व प्रकाराकडे पालिका प्रशासनाकडून हाेणारे दुर्लक्ष संशयास्पद वाटते. यामुळेच अतिक्रमणधारकांकडून धारिष्ट्य केले जाते.

आेट्यांवर अनधिकृत बांधकामे
^पालिकेच्या तिबेटियन मार्केट जवळच्या भाजी मंडईत पार्किंग अन‌् आेट्यांवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम करून गाळे बांधले अाहेत. याकडे अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष हाेते. - गणेश अत्रे, नागरिक

मालकांची प्रतीक्षा...
महापालिकेच्या व्यापारी गाळ्यांचा करार तत्त्वावर लिलाव हाेतो. या गाळ्यांसाठी ठिकाण, पाणी तसेच मूलभूत सुविधा महत्त्वाच्या असतात. त्यांची उणीव असल्यास नागरिक दुर्लक्ष करतात. या गाळ्यांतून कर स्वरूपात महापालिकेच्या तिजोरीत भर पडते. मात्र, फक्त गाळे बांधण्यावर भर देऊन महापालिका अलिप्त राहात असल्याने मूलभूत सुविधांचा अभाव राहिल्याने मालकांची प्रतीक्षाच अाहे.

मंडई वापराविनाच...
महापालिकेने सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या गणेशवाडी येथील नूतन मंडईत गंगाघाटावरील भाजीबाजार स्थलांतरित करण्याची महापालिकेची घोषणा कागदावरच राहिली आहे. मंडईतील ओट्यांचे लिलाव करून वर्ष उलटले आहे. परंतु, प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि दुबळे प्रशासन यांमुळे ही नूतन मंडई वापराविना पडून आहे.
रोहिदास बहिरम, उपआयुक्त,अतिक्रमण विभाग, महापालिका

फुले मार्केटला दुर्गंधीचा विळखा
जुने नाशिक येथील सर्वांत जुनी मंडई म्हणून प्रसिद्ध असलेल्या महात्मा जोतिबा फुले मार्केटला सध्या अतिक्रमण, दुर्गंधीचे ग्रहण लागले आहे. आता या मार्केटला मॉलचे स्वरूप देऊन नव्याने बांधण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी महापालिकेला कोट्यवधींचा हा खर्च परवडणारा नसल्याने ते बीओटी तत्त्वावर बांधण्याची चाचपणी होत आहे. मात्र, तोपर्यंत तरी महात्मा फुले मार्केट विविध समस्यांतून बाहेर पडणार की नाही, असा प्रश्न स्थानिकांना पडत आहे.

पालिकेची फसवणूक; उत्पन्नावर फिरते पाणी
महापालिकेचे गाळे नाममात्र भाडेतत्त्वावर घेऊन त्यामध्ये पोटभाडेकरूंच्या माध्यमातून व्यवसाय थाटून सर्रास फसवणूक केली जात आहे. त्यामुळे यापुढे गाळेधारकांना गाळ्याच्या दर्शनी भागावर फोटोसह महापालिकेशी केलेल्या करारातील अटी-शर्तींचे फलक लावण्याचे आदेश स्थायी समिती बैठकीत सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिले होेते. यामुळे महापालिकेची फसवणूक थांबली असती. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालीच नसल्याचेही ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे.

टवाळखोरांचा वावर वाढला
शिंगाडा तलाव परिसरातील महापालिकेच्या मार्केटमधील अनेक गाळे विकलेच गेले नसल्यामुळे ते रिकामे पडून आहेत. वापराविना पडलेल्या या जागेवर रात्रीच्या वेळेस मद्यपींच्या पार्ट्या रंगत असल्याच्याही तक्रारी आहेत. या गाळ्यांचा लिलाव केल्यास महापालिका प्रशासनाला त्यातून नक्कीच मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकते.

आेट्यांवर, पार्किंगमध्ये मोठमोठी बांधकामे
महापालिकेच्या शरणपूररोडवरील तिबेटियन मार्केटजवळ असलेल्या भाजी मार्केटमध्ये फक्त भाजी आणि मासे विक्रेत्यांसाठी आेटे बांधण्यात आलेले आहेत. मात्र, या ठिकाणी एका व्यापाऱ्याकडून आेट्यांवरच मोठमाेठी अनधिकृत बांधकामे करून दुकानेही थाटल्याच्या तक्रारी आहेत. या ठिकाणी ‘डी. बी. स्टार’ने पाहणी केली असता आेट्यांवर बांधकाम केल्याचे आढळून आल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराचे दर्शन घडले.
बांधकामांबाबत तातडीने माहिती घेताे...
थेट प्रश्न
महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जात असताना, पालिकेमार्फतच उभारण्यात आलेल्या मार्केटमधील आेट्यांवरील बांधकामांकडे मात्र काणाडाेळा केला जात असल्याच्या तक्रारी अाहेत. या अाेट्यांवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे. या गाळ्यांसंदर्भात परस्पर व्यवहार केले जात असून, लाखोंची थकबाकी असतानाही मोठ्या प्रमाणावर बांधकाम करून त्यावर पोटभाडेकरू टाकले जात असल्याचे दिसून येते. या सर्व प्रकाराबाबत प्रशासन मात्र अंधारातच असल्याचे दिसून येते. ‘डी. बी. स्टार’चा त्यावर प्रकाशझोत...
शहरातील विविध मार्केटमध्ये वाढले अनधिकृत बांधकाम, प्रशासनाकडून कारवाईत दिरंगाई
{ शहरात महापालिकेच्या मार्केट्समधील आेट्यांवर अनधिकृत बांधकामे केल्याच्या तक्रारी आहेत, त्याची माहिती आहे का?
-अशा काही तक्रारी अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. तरीही त्याची माहिती घेतो.

{शरणपूररोडवरील पालिका भाजी मंडईच्या आेट्यांवर अनधिकृत बांधकामे करण्यात आलेली आहेत, त्याचे काय?
-आेट्यांवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करूच शकत नाही. असे असल्याच त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल.

{पवननगर परिसरातील जुने नाशिक परिसरातील फुले मार्केटमध्येही असेच अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे, त्याचे काय?
-भाजी मंडईतील सर्व अनधिकृत बांधकामांबाबत तातडीने माहिती घेताे. फुले मार्केट मंडईच्या नूतनीकरणाचे काम लवकरच होईल. त्याबाबतही माहिती घेतो.
बातम्या आणखी आहेत...