आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतण्याच्या ‘उद्योगा’नंतर आता काकांची मोर्चेबांधणी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्रातील पवार खानदानाच्या राजकीय परंपरेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेताल वक्तव्यामुळे गंभीर ठेच पोहचल्यानंतर दस्तुरखुद्द काकासाहेब अर्थात शरदराव यांनी भावनांचा भडकलेला आगडोंब विझविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी दिल्लीमधील प्रस्तावित शासकीय वा खासगी बैठका, पक्ष मेळावा रद्द करीत त्यांनी सोमवारीच थेट बारामती गाठली अन् पाठोपाठ आज (बुधवार, दिनांक 10) मुंबईस्थित पक्ष कार्यालयात साहेब ठिय्या मारणार आहेत.


साहेबांचा दरारा आणि दादांचा धाक अशा कात्रीत सापडल्यामुळे राष्ट्रवादीचे बडे नेतेही त्याबाबत उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. मात्र, नाव न सांगण्याच्या अटीवर संबंधितांनी मुंबईत होऊ घातलेल्या या बैठकीबाबत दुजोरा दिला आहे. पंधरवड्यापूर्वी ऐन संसदेच्या अधिवेशनाच्या तोंडावर शरदरावांनी राज्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त गावांचा दौरा केला होता. तब्येतीचा फारसा विचार न करता शरदरावांनी रणरणत्या उन्हामध्ये लोकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा दौरा तीन दिवसांहून अधिक काळ सुरू होता. त्यातून त्यांची महाराष्ट्रातील जनतेविषयीची तळमळ वा जिव्हाळा सामोरा आला होता.

या पार्श्वभूमीवर, त्यांचे पुतणे अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी अश्लाघ्य भाषा वापरल्यामुळे तीन-चार दिवसांपासून अवघी मराठी जनता संतप्त झाली आहे. हीच स्थिती येत्या काळातही राहिली आणि जनतेचा रोष थंडावला नाही तर 2014 मध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये पक्षाला जबर फटका सहन करावा लागू शकतो. एवढेच नाही तर महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून स्वत:ची जी प्रतिमा काही दशकांपासून निर्माण झाली त्याला जबर तडा जाण्याची साधार भीती शरदरावांना वाटू लागली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या बेताल वक्तव्यामुळे पवार खानदानाच्या राजकीय परंपरेला पोहचलेली जबर ठेच पाहता आणि पक्षीय राजकारणावर त्याच्या दूरगामी परिणामाची शक्यता लक्षात घेता शरदराव प्रचंड अस्वस्थ आहेत. परिणामी त्यातच त्यांनी सोमवारी दिल्लीस्थित सर्व कार्यक्रम गुंडाळून थेट बारामती गाठली. तेथे विश्वासू सहकाºयांशी सल्लामसलत केल्यावर उद्या, बुधवारी मुंबईस्थित राष्ट्रवादी कार्यालयात दुपारी 12 वाजता हजेरी लावण्याचा निर्णय घेतला आहे. पुतण्याच्या उद्योगांमुळे त्रस्त असलेले शरदराव आता कोणती खेळी खेळतात, आणि पुतण्याचे संरक्षण कसे करतात, याकडे मराठी जनतेचे पर्यायाने देशाचे लक्ष लागले आहे.