आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यदायी वायनरीच्या खाली विदेशी मद्यविक्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्यदायी वायनरीला विदेशी मद्यविक्रीचा ज्वर
मनोरंजक पार्ट्यांच्या नावाखाली मद्याची विक्री
नाशिकच्या प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष केवळ महसुलावर
भूषण महाले । नाशिक
द्राक्षाला स्थानिक बाजारपेठ मिळावी म्हणून ‘आरोग्यदायी’ वायनरीचे पीक नाशिकमध्ये वाढू लागले असताना, काही वायनरींमध्ये मनोरंजनाच्या नावाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘आशीर्वादा’ने उंची मद्यविक्रीचे प्रकार सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे या संदर्भात उत्पादन शुल्क विभागाने केवळ परवाना देण्यापुरतीच भूमिका मर्यादित ठेवली असून, जिल्हाधिका-यांच्या अखत्यारीतील करमणूक कर विभागाने प्रवेश शुल्कातून मिळणा-या करवसुलीपुरतेच उद्दिष्ट ठेवले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून काही वायनरी परजिल्ह्यातील नव्हे, तर परदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एंटरटेनमेंट फंक्शनच्या नावाखाली (मनोरंजक कार्यक्रम) चक्क महागड्या विदेशी मद्याची विक्रीच करीत असल्याचे प्रकार समोर आले आहे. मात्र, ‘ना विकणा-या ंची हरकत ना पिणा-यांची’ असे कारण पुढे करीत सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्षाची भूमिका घेतली जात आहे.

प्रवेश शुल्क दोन हजारांपर्यंत
मद्यविक्रीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एकदिवसीय परवाना विक्रीचा आधार घेतला जात असून, 8 हजार 50 रुपये आकारून दिवसभर विदेशी मद्यविक्रीसाठी परवानगी मिळवली जाते. अशा कार्यक्रमांना निव्वळ प्रवेशापोटी पंधराशे ते दोन हजार रुपयांचे शुल्क आकारले जात असून, यातून जिल्हा प्रशासनाला करमणूक करापोटी नाममात्र महसूल मिळत आहे. तुलनेत अशा पार्ट्यांनंतर बेधुंद झालेल्यांकडून पर्यावरण प्रदूषित करण्याचे प्रकार घडतात, याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

धरणावर प्रदूषणाचे संकट
अशा प्रकारच्या मनोरंजक पार्ट्या आयोजित करण्यासाठी गंगापूर धरण क्षेत्रातील एका वायनरीने वर्षभरात 18 वेळा परवानगी घेतल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिका-यांनी सांगितले. अशा पार्ट्यांच्या माध्यमातून निर्माण होणारा प्लास्टिकचा कचरा वा अन्य प्रदूषणाकडे मात्र सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात असून, उत्पादन शुल्क, जिल्हाधिकारी कार्यालय व प्रदूषण नियंत्रण मंडळासारखे विभाग अधिकार नसल्याचे कारण देत हात झटकताना दिसत आहेत.

स्थळ एक, आयोजक अनेक
फार्महाऊस, वायनरी, मोठ्या हॉटेलच्या प्रांगणात ओपन डोअर पार्टीचे प्रमाण वाढत असून, त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्य पिण्यासाठी 2012 या वर्षभरात 187 परवाने वितरित करण्यात आले आहे. अशी परवानगी मिळवण्यासाठी अर्जदाराची नावे स्वतंत्र असतात. मात्र, स्थळांची नावे एकच असल्यामुळे विदेशी मद्याच्या पार्टीच्या निमित्ताने विक्री करणा-या काही मोठ्या वायनरीकडे लक्ष वेधले जात आहे.