आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Under Pass Raod Issue At Nashik, News In Marathi

अंडरपास दुरुस्तीसाठी नितीन गडकरींना साकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उड्डाणपुलाच्या सदोष अंडरपासमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अंडरपास आणि सर्व्हिसरोडबाबतचे नियमही धाब्यावर बसविल्याने शहरवासीयांना मात्र त्याचा जाच सहन करावा लागत असल्याची तक्रार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सने केंद्रीय रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. उड्डाणपूल आणि मुंबई-नाशिक महामार्गाच्या अनुषंगाने भविष्यातील विकास ध्यानात घेता काही बदल व तरतुदी करण्याची मागणी गडकरी यांच्याकडे असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

शुक्रवारी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाकरिता गडकरी नाशिक दौर्‍यावर होते. या वेळी शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या काही संघटनांनी गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शहर विकासाच्या दृष्टीने अनेक मागण्या केल्या. यात बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेली क्रेडाई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स यांचा प्रामुख्याने समावेश होता. गडकरी यांनी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदाधिकार्‍यांसह या दोन्ही संघटनांशी दीर्घकाळ चर्चा करून विषयांची माहिती घेतली व सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वस्त केले.
या मागण्यांचा आहे समावेश
उड्डाणपुलाखालील इंदिरानगर जंक्शनच्या दोन्ही बाजूला डीपीरोड हा 30 मीटरचा असून, केवळ 9 मीटर रुंदीचा अंडरपास येथे देण्यात आला आहे. यामुळे येथे वाहतुकीची कोंडी कायम निर्माण होते. अपघातात मृत्यूही होतात. अशा प्रकारच्या जंक्शनवर तीन प्रकारचे रस्ते हवेत. त्यात एक मुख्य उड्डाणपूल, दुसरा उजवीकडे आणि डावीकडे वळण्यासाठी रस्त्याला समांतर हवा आणि तिसरा सरळ जाण्यासाठी अंडरपास हवा. मात्र, तशी तरतूद न केली गेल्याने लोकांना हकनाक जीव गमवावे लागत आहेत. इंदिरानगर, द्वारका, मुंबईनाका, जुना आडगाव नाका आणि नवीन आडगाव नाका येथे अशा प्रकारचे रस्ते अपेक्षित आहेत. के. के. वाघ महाविद्यालयाजवळ उड्डाणपूल गरजेचा आहे. मात्र, तो प्लॅनमध्ये नाही याकडेही गडकरी यांचे लक्ष वेधण्यात आले असून, नाशिकरोड ते द्वारका या रस्त्याचे रुंदीकरण होणार असून, त्याचे सुयोग्य नियोजन आताच होणे अत्यावश्यक असल्याची मागणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सतर्फे करण्यात आली आहे.

नागपूर-पुणे बुलेट ट्रेनची ‘क्रेडाई’ने केली मागणी
आगामी कुंभमेळा ध्यानात घेता नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण करणे गरजेचे आहे. नाशिक-कसारा लोकल सुरू करण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी क्रेडाईने गडकरी यांच्याकडे केली. नाशिक-वापी रस्ते जोडले जावेत, नाशिक-नगरसूल लोकल सुरू व्हावी, जेणेकरून दक्षिण भारताशी नाशिक सहज जोडले जाईल. मुंबई ते नागपूर अशी बुलेट ट्रेन सुरू व्हावी व त्याला नाशिक येथे थांबा असावा. नाशिकला आयआयएम मिळावे, उत्पन्न कराचे कलम 43 सीए रद्द करण्यात यावे, जेणेकरून सामान्यांना घर घेणे सुलभ होईल, अशी मागणी क्रेडाईच्या वतीने अध्यक्ष जयेश ठक्कर, सचिव नरेश कारडा यांनी केली.