आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युनियन बँकेला घातला अडीच कोटींचा गंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- युनियन बँकेकडून व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जापोटी सादर केलेले तारण मालमत्तेचे कागदपत्रे बनावट आढळल्याप्रकरणी सुमारे 20 कर्जदारांविरुद्ध अडीच कोटींना गंडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी सात जणांना अटक केली.

सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल होताच संशयितांना ताब्यात घेतले. बँकेचे अधिकारी सोपान सेनगुप्ता यांच्या तक्रारीनुसार, संशयित सोमनाथ खंडू नेहे (रा. एकदंत अपार्टमेंट, पाथर्डी फाटा) यांच्यासह 20 जणांनी बँकेकडून वर्षभरापूर्वी 10 ते 20 लाखांपर्यंत कर्ज प्रकरणे तयार करून कर्ज घेतले. या कर्जाची रक्कम प्राप्त करून त्याचे हप्ते ते नियमित भरत होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून हप्ते थकल्याने बॅँकेकडून मालमत्ता जप्तीची कारवाई हाती घेण्यात आली होती. त्यावेळी कागदपत्रांच्या तपासणीत नेहे यांच्यासह इतर 19 कर्जदारांनी दिलेले तारण मालमत्ता, खरेदीखताचे कागदपत्र बनावट आढळले. त्यानुसार, सरकारवाडा पोलिसांत संशयितांविरुद्ध फसवणूक व बोगस कागदपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन सोमनाथ नेहे, दिलीप गुप्ता, संतोष परदेशी, दीपक गोसावी, मकरंद जठार, मिलिंद दिवाणे व संतोष चव्हाण यांना अटक झाली.

बँकांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
बहुतांश बॅँका हे कर्जप्रकरण स्वतंत्र कर्ज विभागात सादर करतात. यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त केली जातात. या पथकांमार्फत प्रत्येक कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली जाते. प्रत्यक्ष जागेवर जाऊन बांधकाम असो की व्यवसाय त्याची पाहणी केली जाते. एवढेच नव्हे तर मंजूर कर्जाच्या रकमेचा धनादेश देतानाही तो संबंधित बांधकाम व्यावसायिक अथवा व्यावसायिकाच्या नावे काढला जातो. कर्जदारांना दोन जामिनदार, त्यांची कागदपत्रे, मालमत्ता व उत्पन्न विवरणपत्राची तपासणी केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच कर्ज मंजूर होते. असे असताना या कर्ज प्रकरणात मात्र बँकेकडून दुर्लक्ष झाले की त्याकडे हेतुत: डोळेझाक करण्यात आली, असा सवाल पोलिस यंत्रणेकडून उपस्थित केला जात आहे.

बँक कर्मचार्‍याचा सहभाग स्पष्ट
बॅँक व्यवस्थापनाने या प्रकरणी अंतर्गत चौकशी केली असता त्यात कर्ज मंजूर करणारे अधिकारी अमितकुमार मल्ल यांचा स्पष्ट सहभाग दिसून आला. त्यानुसार प्राथमिक चौकशीतच त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानुसार, या गुन्ह्यातही त्यांना आरोपी करण्यात आले आहे. सुरेश सपकाळे, वरिष्ठ निरीक्षक