आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा विद्यार्थ्यांना ताप, विधी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपीची प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अनुत्तीर्ण झालेल्या विषयांची फोटोकॉपी मिळवण्यासाठी प्रति विषय शुल्क भरून विद्यापीठाकडे अर्ज करून महिनाभराचा कालावधी उलटूनही त्यांना फोटोकॉपी मिळालेली नाही. फोटोकॉपी पुनर्मूल्यांकन होताच विद्यापीठाने पुढील सेमिस्टरसाठी परीक्षा अर्जही भरून घेतले आहेत.
 
फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन आणि परीक्षा अर्ज या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून भरमसाट शुल्क आकारले जात असूनही वेळेवर निकाल लागत नसल्याने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सर्रास आर्थिक लूट केली जात आहे. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला असून, विद्यापीठाकडून केवळ शुल्कच्या माध्यमातून आर्थिक लूट केली जात अाहे.
 
पुणे विद्यापीठाकडून नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाची सत्र (सेमिस्टर) परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचे निकाल फेब्रुवारी २०१७ मध्ये जाहीर करण्यात आले. यात जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी मिळवण्यासाठी प्रति विषय १५० रुपये शुल्क भरले आहे. महिनाभराचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना फोटोकॉपी मिळालेली नाही. फोटोकॉपीनंतर विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करतात.
 
त्यासाठीही १०० ते १५० रुपये शुल्क भरावे लागतात. महत्त्वाचे म्हणजे, फोटोकॉपी पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करताच मे २०१७ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे अर्ज भरून घेतले आहे. त्यासाठीही विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह बॅकलॉगच्या विषयांचेही शुल्क भरले आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून फोटोकॉपी पुनर्मूल्यांकन वेळेवर होत नसल्याने विद्यार्थ्यांचे पैसे नाहक वाया जात आहे. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना होत असून, त्यांची आर्थिक लूटच केली जात अाहे.
 
विधीच्या निकालातही गोंधळ
विधीशाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी जानेवारी २०१७ मध्ये प्रथम सत्र परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल मार्चमध्ये जाहीर झाला. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठाकडे अर्ज केला आहे. विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यापूर्वीच ११ एप्रिलपासून पुन्हा परीक्षेचे नियोजन केले आहे. या परीक्षा दुसऱ्या सत्रातील अंतिम परीक्षेच्या वेळी घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
 
मनविसेकडून आंदोलनाचा इशारा
इंजिनिअरिंगच्याविद्यार्थ्यांची फोटोकॉपी तत्काळ उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून विद्यापीठाच्या उपकेंद्र कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष श्याम गोहाड यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवून विद्यापीठाने कार्यपद्धतीत सुधारणा करावी, अशी मागणीही मनविसेकडून करण्यात आली असून, ते विभागीय सन्मवयकांना निवेदन देणार आहे.
 
..तर शुल्काचा भुर्दंड
फोटोकॉपी तत्काळ उपलब्ध करून दिल्यास पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. अनुत्तीर्ण विषय जर उत्तीर्ण झाले तर पुन्हा त्या विषयांची परीक्षा देण्याची गरज नाही. त्यामुळे आर्थिक ताणही पडणार नाही.
- निनाद पाटील, विद्यार्थी
 
बातम्या आणखी आहेत...