आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदोष निकालांची अखेर विद्यापीठ करणार दुरुस्ती, गुणपत्रके परत पाठवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका एम. कॉम.च्या विद्यार्थ्यांनाही बसला आहे. त्यामुळे परीक्षा देऊनही अनेकांना गैरहजर दाखविण्यात आले होते. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी आवाज उठविल्यानंतर त्याची दखल घेत केटीएचएम महाविद्यालयानेही सदोष गुणपत्रके दुरुस्तीसाठी विद्यापीठाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सदोष निकालांची तपासणी होऊन सुधारित निकाल जाहीर होणार आहेत.

मागील महिन्यात वाणिज्यच्या पदव्युत्तर विभागाचा निकाल जाहीर झाला. त्यात एम. कॉम.च्या गुणपत्रकांमध्ये अनेक गंभीर चुका निदर्शनास आल्या होत्या. महाविद्यालयाकडून देण्यात येणारे अंतर्गत गुण देता अंतिम निकालामध्ये त्यांना गैरहजर दाखविण्यात आले होते. निकालातील अक्षम्य चुकांबाबत त्रस्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे दादही मागितली होती. परंतु त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेलीच नाही. विद्यार्थ्यांना पुन्हा ऑक्टोबरची परीक्षा देण्याचे सूचविण्यात आले होते. निकालातील या गोंधळाबाबत अखेर विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनेकडे दाद मागितल्यानंतर अजिंक्य गिते यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांची बुधवारी (िद. ५) भेट घेऊन सदरची माहिती दिली.

विद्यार्थ्यांच्या तक्रारींची गंभीरपणे दखल घेत प्राचार्य धोंडगे यांनीही सदोष निकालाबाबतची माहिती परीक्षा नियंत्रकांच्या लक्षात आणून दिली. चुकीचे गुणपत्रक जमा करून ते पुन्हा विद्यापीठाकडे दुरुस्तीसाठी पाठविले जातील, असे आश्वासन या वेळी धोंडगे यांनी दिले.
विद्यार्थ्यांना दिलासा
सदोष निकाल पुन्हा विद्यापीठाकडे पाठविले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा ऑक्टोबरची परीक्षा द्यावी लागणार होती, त्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यापीठाकडून अशा चुका सातत्याने होत असल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. महाविद्यालयांनीही यासंदर्भात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
अजिंक्य गिते, विद्यार्थी संघटना
विधी शाखेच्या निकालातही अक्षम्य चुका
गतआठवड्यात बीवायके महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकांमध्येदेखील विद्यापीठाकडून अशाच प्रकारच्या चुका झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर बीवायके महाविद्यालयाने अशा गुणपत्रिका जमा करून घेत त्या पुन्हा विद्यापीठाकडे पाठविल्या आहेत. असे असले तरीही, अद्याप एलएलएमसंदर्भात मात्र कोणतीही कार्यवाही महाविद्यालयाकडून झालेली नाही. एलएलएमच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणांसंदर्भात विद्यापीठाकडे तक्रार केली आहे.
बातम्या आणखी आहेत...