आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस, गारपीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या काही महिन्यांत गारपिटीच्या संकटाने उद्ध्वस्त झालेल्या नाशिक जिल्ह्यातील शेती व शेतक-यांना मंगळवारी पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा तडाखा बसला. दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते, त्यातच सायंकाळी पाचच्या सुमारास निफाड, कळवण, मालेगाव, देवळा, सिन्नर, येवला, दिंडोरी तालुक्यात मुसळधार अवकाळी पावसासह गारपीट झाली. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथेही जोरदार गारपीट झाली. द्राक्ष, लाल कांदा, डाळिंब आणि टोमॅटोला या पावसामुळे पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे.

चक्राकार वा-याचा परिणाम
रविवारी पूर्व-मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वा-यांची स्थिती होती. नैऋत्य बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या पूर्व किना-यालगत कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकला आहे. त्याला लागूनच लक्षद्वीप परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत होते. त्यामुळे दक्षिण भारतात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तसेच उत्तर व ईशान्य भारतात धुके पडण्याची शक्यताही
वर्तवण्यात आली आहे.

पूर्वेकडील वा-यामुळे उत्तर- मध्य महाराष्ट्रापासून लक्षद्वीप बेटांपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने उत्तर महाराष्ट्र परिसरासह विदर्भ आणि मराठवाडा भागात मंगळवारी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. नाशिक जिल्हयातील निफाड तालुक्यात उगाव, नांदुर्डी, निफाड, देवपुर, पचकेश्वर, कुंदेवाडी, रौळस, पिंप्री, सुकणे, निफाड साखर कारखाना, रुई, भेंडाळी, सायखेडा, शिरसगाव, कंरजगाव, भुसे चापडगाव, म्हाळसाकोरे या गावामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. कळवण तालुक्यात कळवण खुर्द, चणकापुर, करंभेळ, शिरसमणी, नांदुरी, कुंडाणे, मानुर तसेच सिन्नर तालुक्यातील वंडागळी, किर्तागंळी या गावांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट झाली. दिंडोरी तालुक्यातील हस्ते दुमाला आणि वणी परिसरात आणि येवला तालुक्यात मुखेड, सत्यगाव, वाकद येथे हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. जिल्हयात रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली होती तर कमाल तपमान हे ३२ अंश सेल्सीअस पर्यंत गेले होते. तरीही वातावरणात गारवा जाणवत होता.