आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Up gradation Of Nasik Road Railway Station To Begin Soon

तयारी कुंभमेळ्याची: नाशिकरोड स्थानकाच्या दुहेरी प्लॅटफॉर्मचा आराखडा तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने नाशिकरोड स्थानकावर मंजूर नवीन दुहेरी प्लॅटफॉर्मचा आराखडा तयार केला आहे. जुन्याप्रमाणेच नवीन प्लॅटफॉर्मवरील सोयी-सुविधांचा त्यात समावेश आहे.

आराखड्यात पूर्व बाजूकडील प्रवेशद्वार, आरक्षण, तिकीट कार्यालयाचादेखील समावेश आहे. राज्य शासनाने या कामासाठी दहा कोटी 36 लाख रुपये मंजूर केले आहेत. या अनुदानातून चौथ्या व पाचव्या अशा दुहेरी प्लॅटफॉर्मची उभारणी केली जाणार असून, दोन ट्रॅकदेखील यात असतील. एक ट्रॅक तयार असून, दुसर्‍या ट्रॅकची उभारणी प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाल्यानंतर होईल. मंजूर निधी अद्याप स्थलांतरित झाला नसल्याने कामाला येत्या काही दिवसात सुरुवात होईल आणि तीन महिन्यांत काम पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टर्मिनस म्हणून वापर

सिंहस्थाच्या काळात प्रचंड संख्येने येणारे प्रवासी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनातर्फे देशभरातून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येणार असून, येणार्‍या-जाणार्‍या सर्व गाड्यांनाही या प्लॅटफॉर्मवर थांबा दिला जाणार आहे. एक प्रकारे या प्लॅटफॉर्मचा वापर टर्मिनस म्हणूनच केला जाणार असल्याचे माहितगार सूत्रांनी सांगितले.

मंडल प्रबंधकाकडून पाहणी

भुसावळ मंडल प्रबंधक महेशकुमार गुप्ता यांनी बुधवारी सकाळी नाशिकरोड स्थानकासह सिंहस्थातील मंजूर कामांच्या ठिकाणांची पाहणी केली. त्यात चौथा, पाचवा प्लॅटफॉर्म, तिसर्‍या पुलाची उभारणी, सुभाषरोडच्या बाजूच्या परिसरात सक्यरुलेटिंग काम, प्रतीक्षालय, स्टॉल, कॅन्टीन, स्वच्छतागृहाची पाहणी करून अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत अधीक्षक एम. बी. सक्सेना, सी. जी. चित्तम, एस. डी. कीर्तीकर, एम. के. कुठार, अनिल बागले आदी उपस्थित होते.

असा असेल प्लॅटफॉर्म

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर सध्याच्या तीन प्लॅटफॉर्मप्रमाणेच 26 डब्यांची गाडी उभी राहू शकेल यानुसार नवीन दुहेरी प्लॅटफार्मची लांबी 585 मीटर असणार आहे. प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी पादचारी पूल, विक्रेत्यांच्या मागणीनुसार स्टॉलसाठी जागा, स्वच्छतागृह, शौचालय, प्रतीक्षालय, तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलाचे नवीन प्लॅटफॉर्मवर विस्तारीकरण व दुहेरीकरण अशी कामे आराखड्यानुसार करण्यात येणार आहेत.

अधिकार्‍यांचे मुक्तिधाम दर्शन

नाशिकरोड स्थानकाच्या पाहणीच्या निमित्ताने नाशिकरोडला येणारे भुसावळ मंडलचे बहुतांश अधिकारी नाशिक दर्शनाचा लाभ घेतातच. त्याच धर्तीवर बुधवारीदेखील भुसावळ मंडल प्रबंधक महेशकुमार गुप्ता यांनी मुक्तिधामचे दर्शन घेतले.