आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UPA Goverment Not Come Back ; Pridicted Kumar Ketkar

यूपीए सरकार येणार नाही; कुमार केतकर यांचे भाकीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सन 2014 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉँग्रेसचे पर्यायाने यूपीएचे सरकार सत्तेत येणार नाही, अशी भविष्यवाणी करतानाच ही निवडणूक देशाच्या इतिहासात सर्वात ऐतिहासिक ठरणार असून, या निवडणुकीनंतर येणारी आव्हाने पेलण्याचे साहस खर्‍या अर्थाने आपल्याला करायचे असल्याचे प्रतिपादन ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी केले.


परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या खैरनार गुरुजी स्मृती व्याख्यानमालेत ‘आव्हान अराजकतेचे’ या विषयावर केतकर बोलत होते. व्यासपीठावर केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप धोंगडे, माजी प्राचार्य पी. एस. पवार, ज्योती स्टोअरचे संचालक वसंतराव खैरनार, ज्योतिराव खैरनार, राजेंद्र खैरनार, जयंतराव खैरनार आणि डॉ. राजेंद्र खैरनार उपस्थित होते.

इतिहासावर प्रकाश
देशाच्या इतिहासातील स्वातंत्र्य मिळायच्या पूर्वीपासून आजपर्यंत आलेल्या अराजक परिस्थितीवर केतकर यांनी प्रकाश टाकला. 1952 ते 62 हा काळ अराजकतेचा असला तरी याच काळात दोन पंचवार्षिक योजना राबविल्या गेल्या. ज्यामुळे आयआयटीसारख्या संस्था देशात आल्या, ज्या आज आयकॉन बनल्या आहेत. महायुद्धानंतर एकही देश असा नाही जो स्वातंत्र्य मिळविल्यानंतर 65 वर्षे लोकशाही टिकवून आहे, यातच नेहरूंच्या कार्याची महती दिसून येते. नेहरूंनंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. 1971 मध्ये ‘गरिबी हटाव’चा नारा देत इंदिरा गांधींना पुन्हा बहुमत मिळाले. सन 1975मध्ये बांगलादेशचे प्रमुख मुजीबुर रहेमान त्यानंतर पाकिस्तानचे प्रमुख लियाकत अली भुत्ताे आणि 1984मध्ये खलिस्तान्यांनी इंदिरा गांधींची हत्या केली. 1971 ते 1984 या काळात आशिया खंडातील तीन देशांच्या प्रमुखांच्या हत्या झाल्याने हा काळ सर्वात अराजकतेचा होता. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधानपदी आले. त्यांनी 1985 मध्ये संगणक युग देशात आणले. बोफोर्स आणि अयोध्येच्या मुद्यावरून तेही अडचणीत आले, 1991 मध्ये त्यांची हत्या झाली, तेव्हापासून अस्थिर सरकार देशात सन 2004 पर्यंत वारंवार पाहायला मिळाल्याचे सांगतानाच, आता हीच स्थिती पुन्हा येणार असल्याकडे केतकर यांनी लक्ष वेधले.


केतकर म्हणाले
*1985 मध्ये राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली 525 पैकी 404 जागांवर विजयी झालेल्या काँग्रेसला 1989 मध्ये 200 जागा कमी मिळाल्याचा संदर्भ.
*येत्या निवडणुकीत भाजपला 182 किंवा कॉँग्रेसला 180 जागा मिळाल्या तर आघाडीचे सरकार येईल. पण, या दोन्ही पक्षांना 150 च्या आत जागा मिळाल्या तर मात्र तिसर्‍या आघाडीचे सरकार येणार असून, ते अल्पकालीन सरकार असेल.
*ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी थेट संबंध नाही, अशा नेतृत्वाच्या हाती सत्ता असेल. त्यामुळेच संसदीय अराजकाचा सामना करावा लागणार आहे.
*महागाईच्या मुद्यावर नाही तर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरच या सरकारचा पराभव होण्याची शक्यता.