आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Urban Planing Sub Director Compromises With Construction

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगररचना खात्याच्या उपसंचालकांचा बांधकाम व्यावसायिक, जमीनदाराशी साटेलोटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - काही बांधकाम व्यावसायिक, जमीनदार आणि वास्तुविशारदांनी नगररचना खात्याच्या उपसंचालकांशी साटेलोटे करीत शहरातील आरक्षणांचा अक्षरश: बाजार मांडल्याचा सनसनाटी आरोप महासभेत सदस्यांनी शुक्रवारी केला.
या मंडळींनी आरक्षणे बदलण्याच्या बदल्यात कोट्यवधींची माया जमवल्याचा दावाही सदस्यांनी केला. या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास गोपनीयतेचा भंग होणार असल्याचे महापौरांनी या वेळी सांगितले. नगरसेवकांनी व नागरिकांनी आपल्याला मिळालेल्या नकाशाच्या प्रती आयुक्तांकडे जमा कराव्यात, असे आवाहन करतानाच आराखडा फुटल्याचे स्पष्ट झाल्यास हा संपूर्ण विकास आराखडाच रद्द करण्याची भूमिका महापालिका घेऊ शकते, असे संकेत महापौरांनी दिले. पालिकेचा विकास आराखडा तयार करण्याचे काम शासनाच्या नगररचना खात्याने केले असून, संबंधित आराखडा सीलबंद पाकिटात आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, हे सील फोडण्याच्या आतच हा आराखडा फुटला असून, त्याच्या प्रती शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारद तसेच जमीनमालकांकडे उपलब्ध आहेत, असा दावा करीत प्रा. देवयानी फरांदे, शिवाजी सहाणे, गुरुमित बग्गा, अशोक सातभाई आणि संजय चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीवर महासभेत तीन तास चर्चा झडली. या वेळी विविध आरोप करतानाच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी तसेच नगररचना उपसंचालक सुलेखा वैजापूरकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली.
राष्टÑवादीच्या गटनेतेपदी कर्डक : गेल्या अनेक दिवसांपासून राष्टÑवादीच्या गटनेतेपदाची चर्चा सुरू होती. विनायक खैरे यांचा दीड वर्षाचा कार्यकाळही पूर्ण झाला होता. शिवाय, पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही गेल्या महिन्यात पक्ष नगरसेवकांची मुंबईत बैठक घेऊन सत्ताधा-यांना तीव्र विरोध करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने राष्टÑवादीच्या गटनेतेपदी कविता कर्डक यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब करून महासभेत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.


अंगणवाडी सेविकांबाबत सोमवारी बैठक : अंगणवाडी मदतनीस व सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी महासभेत सदस्यांनी केली. यासंदर्भात सोमवारी दुपारी 4 वाजता बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे महापौरांनी जाहीर केले.


‘महिला व बालकल्याण’च्या नियुक्त्या जाहीर : महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी नऊ सदस्यांची नियुक्ती महासभेत करण्यात आली. त्यात मनसेच्या वतीने कांचन पाटील, डॉ. दीपाली कुलकर्णी आणि सविता काळे, भाजपच्या वतीने सविता दलवाणी, राष्‍ट्रवादीच्या वतीने उषा आहिरे, सुनीता शिंदे, काँग्रेसतर्फे लता पाटील, शिवसेनेच्या वतीने मनीषा हेकरे व ललिता भालेराव यांची नियुक्ती केली.


चर्चेतील बाबी
> बिल्डर्सबरोबर आर्किटेक्टचीही टोळी कार्यरत
> अनेकांच्या मोबाइलमध्ये आराखड्यातील नकाशे
> आराखड्यातून अधिका-याने जमा केली 60 ते 70 कोटींची माया
> मखमलाबाद येथील आरक्षणाची प्रत आयुक्तांना सादर
> परंपरागत शेतक-यांच्या जागेवर आरक्षणाचा घाट
> शहराच्या एकाच बाजूने आरक्षणांचा भडिमार
> शरद कोशिरे यांच्या चार एकर जमिनीवर आरक्षण


संशयाची सुई वैजापूरकरांवर
नगररचना उपसंचालक सुलेखा वैजापूरकरांवर बहुसंख्य सदस्यांनी संशय व्यक्त करीत आराखड्याच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधींची माया जमा केल्याचा दावा केला. काही बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारदांनी जमीनमालकांचे पत्ते शोधून काढले व त्यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप या वेळी झाला. वैजापूरकरांचे फोन कॉल तपासण्याची मागणी केली गेली.


शासनाकडे चौकशीची मागणी करणार
विकास आराखड्याचे सील मी अद्याप फोडलेले नाही. त्यामुळे पालिकेतून आराखड्याची माहिती बाहेर पडली, असे म्हणणे उचित ठरणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करणारी मागणी मी शासनाकडे माझ्या अभिप्रायातून करणार आहे. - संजय खंदारे, आयुक्त, महापालिका


नकाशांमध्ये साम्य आढळल्यास पुढील कार्यवाही
शहर विकास आराखडा बांधकाम व्यावसायिकांच्या हाती गेल्याचे लक्षात येत आहे. सदस्यांनी आपल्याला मिळालेल्या नकाशांच्या प्रती आयुक्तांकडे जमा कराव्यात. या प्रती आणि आराखड्यातील नकाशे यांच्यात साम्य आढळल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल. - अ‍ॅड. यतिन वाघ, महापौर