आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपारी देणाऱ्या बिल्डरसह चौदा संशयितांना अटक, जागा रिकामी करण्यासाठी गुन्हेगारांचा वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बांधकाम व्यावसायिकाकडून बळजबरीने जागा घेण्यासाठी वृद्धेच्या खुनाची घटना ताजी असताना, पंचवटीमध्ये जागा रिकामी करण्यासाठी सराईत गुन्हेगारांना सुपारी देण्याचा प्रकार रविवारी (दि. १४) दुपारी १२.३० वाजता पेठरोडवरील एका शाळेच्या पाठीमागे उघडकीस आला. या प्रकरणी संशयित बिल्डरसह चौदा संशयितांना पोलिसांनी तत्काळ कारवाई करून जेरबंद केले.

पोलिसांनी दिलेली माहिती अाणि रत्नाकर कोठुळे यांच्या फिर्यादीनुसार, पेठरोडवरील उन्नती शाळेच्या पाठीमागील जागेवर सुमारे ७० वर्षांपासून भाडेकरारावर म्हशीचा तबेला आहे. ही जागा कल्पना पांडे यांनी संशयित बिल्डर गुलाब त्रिपाठी यास विक्री केली अाहे. ही जागा रिकामी करण्यासाठी त्रिपाठीकडून यापूर्वी धमकी देण्यात आली होती. रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास संशयित सराईत गुन्हेगार विनायक ऊर्फ झगड्या दीपक लाटे, किरण शेळके आणि त्यांच्या साथीदारांनी म्हशीच्या तबेल्यात येऊन आई आणि पत्नीसह बेदम मारहाण केली. ही जाग कुठल्याही परिस्थितीमध्ये रिकामी करण्यासाठी जिवे मारण्याची धमकी दिली. जीव वाचवत पंचवटी पोलिस ठाण्यात त्यांनी धाव घेतली. तोपर्यंत संशयितांनी म्हशी सोडून देत गोठ्याची भिंत पाडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी येऊन संशयित अक्षय खर्डे, विकी परदेशी, नीलेश जाधव, किरण सोनवणे, राहुल पाटील, रमेश साळवे, विकी बोदक, केतन हिरवे, विजय पाटील, आकाश भाग्यवंत आणि गंगाराम दिघोळे यांना घटनास्थळावर अटक केली. संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची सतर्कता
पोलिसांनी तक्रारदार पोलिस ठाण्यात आल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी तत्काळ अतिरिक्त पोलिस सोबत घेत घटनास्थळावर धाव घेत संशयितांना वेळीच अटक केल्याने मोठी दुर्घटना टळली. बिल्डरसह संशयितांना वेळीच जेरबंद करण्यास पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे यश आले.