आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेदनाशामक गोळ्यांचा नशेसाठी वापर, 10 ते 15 पट अधिक अधिक दराने गोळ्यांचा काळाबाजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंभीर परिस्थितीत वेदनाशामक म्हणून आणि केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतल्या जाणाऱ्या औषधांचा वापर तरुणाई व्यसनाची हौस भागविण्यासाठी करत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे. विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना ही औषधे देण्यास मनाई असतानाही मूळ किमतीच्या तब्बल दहा ते पंधरापट अधिक दराने या गोळ्या विकून त्यांचा काळाबाजार सुरू आहे. सहजरित्या मिळणाऱ्या या औषधांमुळे तरुणाई मात्र अलगद व्यसनाच्या फेऱ्यात सापडत आहे. या गंभीर प्रकारावर डी. बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत... 
 
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आव्हानांसोबतच ताणतणावातही वाढ झाली आहे. त्याचाच दुष्परिणाम हा आहार, आरोग्य आणि झोपेवरही होत असल्याने त्यावर वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही निद्रानाशाची तक्रार बहुतांश व्यक्तींमध्ये दिसून येत असल्याने, त्यावरील औषधांची विक्रीही भरमसाठ वाढली आहे. मात्र, हीच काही औषधे आता थेट नशेसाठी वापरली जाऊ लागली आहेत. या गोळ्यांचा अतिवापर झाल्यास अथवा अधिक प्रमाणावर त्या घेतल्या गेल्यास त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. 
 
याच कारणाने तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय त्याची विक्री करण्यास मनाई आहे. या गोळ्यांमुळे थेट मेंदूच्या सजगतेवर परिणाम होतो त्यातूनच औषध घेणाऱ्यावर एकप्रकारचा नशेसारखा अमल निर्माण होतो. मात्र, याच गोष्टीचा फायदा घेऊन काही तरुण-तरुणी कधी हौसेपोटी, कधी नशेचा पर्याय म्हणून तर कधी नकळतपणे या औषधांचे सेवन करत आहेत. या औषधांना कुठलाही गंध, चव अथवा रंग नसल्याने घरच्यांना अथवा जवळच्या कुणालाही त्याचा जराही संशय येत नाही. घरापासून लांब शिक्षण, नोकरीसाठी आलेले होस्टेलवरील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने या नशेच्या आहारी जात आहेत. अन्य नशेच्या पदार्थांच्या तुलनेत स्वस्त, सहज उपलब्ध होतील असे आणि खिशात सहज बाळगता येईल अशा या गोळ्या आहेत. 
 
एफडीआयसह पोलिसांपुढेही आव्हान 
मेडिकल्समधून मिळत नसल्या तरीही तरुणाई कुठून ना कुठून या गोळ्या मिळवत आहेत. त्यांचा स्त्रोत नेमका कोणता याचा शोध घेण्याचे आव्हान अन्न औषध प्रशासनासह पोलिसांपुढेही उभे ठाकले आहे. किंबहुना, नाशकात अशी नशा सर्रासपणे होते, याची माहिती या दोन्हीही विभागांतील अनेकांना अद्यापही नाही. त्याचा शाेध घेण्यात येत अाहे. 
 
एका गोळीतून दोन दिवसांची नशा 
टॅबो म्हणून या गोळ्यांच्या काळाबाजार केला जात आहे. विशेष म्हणजे अन्य व्यसनांच्या तुलनेन केवळ एक गोळी घेऊन दोन दिवसांपेक्षा अधिक काळ नशा रहात असल्याने तरुण-तरुणींकडून या गोळ्यांची निवड केली जात आहे. या गोळ्यांना कोणत्याही प्रकारचा वास येत नसल्यामुळे अल्पवयीन मुलेही या गोळ्यांच्या फेऱ्यात अडकत आहेत. 
 
गोळ्यांच्या सेवनाने गंभीर परिणाम 
‘टॅबो’च्या नावाने बाजारात मिळणाऱ्या या गोळ्यांच्या अतिसेवनाने किंवा या गाेळ्या घेण्याच्या सवयीमुळे गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यात शरीरावरील नियंत्रण नसणे, संभ्रमावस्था, त्वचेवर पुरळ उठणे, दृष्टीवर परिणाम होणे, श्वास घेण्यास त्रास वाटणे, मळमळ होणे अशा स्वरूपाचा आजार उद््भवण्याची शक्यता असते. 
 
मद्य, हुक्का अन् आता टॅबो 
तरुणाईमध्येगेल्या काही वर्षांपासून व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढू लागले आहे. व्यसन, नशा करण्यासाठी मद्य, गांजा, हुक्का, व्हाइटनर अशा पर्यायांचा अवलंब केला जातो. मात्र, यामुळे वास येत असल्याने आता तरुणाईने नशा करण्यासाठी टॅबोचाच पर्याय शोधून काढला आहेे. विशेष म्हणजे अशाप्रकारची नशा करणाऱ्यांमध्ये तरुणींचीही संख्या लक्षणीय आहे. या प्रकारामुळे तरुणाई व्यसनाच्या फेऱ्यात दिवसेंदिवस अधिकच अडकत चालली आहे. टॅबोच्या सवयीमुळे कोणत्याही परिस्थितीत या गोळ्या मिळविण्यासाठी व्यसनाधीन तरुण हरतऱ्हेचे प्रयत्न करतात. यातून हाणामारी, वादावादी अन् गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला जातो. या प्रकारामुळे तरुणांच्या स्वास्थ्याबरोबरच सामाजिक स्वास्थ्यही बिघडत असल्याने असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. 
 
गांजासाठीही खास पेपर 
एकीकडेनिर्बंध लादले असतानाही, दुसरीकडे मात्र शहरातील पंचवटी, सिडको, नाशिकरोड, कॉलेजरोड अशा भागांत थेट रस्त्यावर काही टोळक्यांकडून सायंकाळच्या वेळी छुप्यारितीने या गोळ्यांचा काळाबाजार सुरू आहे. विशेष म्हणजे या गोळ्यांची मूळ किंमत ४० रुपये असताना, त्यांची काळ्या बाजारात तब्बल ४०० ते ८०० रुपयांपर्यंत विक्री होते. त्यातही या प्रकारच्या गोळ्या वैद्यकीय सल्ला आणि प्रिस्क्रिप्शन असल्यावरच दिल्या जाणे अपेक्षित असतानाही, प्रत्यक्षात मात्र पैसे मोजा आणि हव्या तितक्या गोळ्या विकत घ्या, असा काळाबाजार सुरू आहे. नशा करण्यासाठी तरुणाईकडून गांजाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. विशेष म्हणजे तंबाखू अाणि गांजा यांची एकत्रित नशा करण्यासाठी बाजारात खास रॅजिला नावाचा पेपरही उपलब्ध आहे. विशेषत:, शहरातील महाविद्यालयीन परिसरात या पेपरसाठी खास कोडवर्डही तयार करण्यात आला आहे. 
 
४० रुपयांची स्ट्रिप मिळते ८०० रुपयांना 
एकीकडेनिर्बंध लादले असतानाही, दुसरीकडे मात्र शहरातील पंचवटी, सिडको, नाशिकरोड, कॉलेजरोड अशा भागांत थेट रस्त्यावर काही टोळक्यांकडून सायंकाळच्या वेळी छुप्यारितीने या गोळ्यांचा काळाबाजार सुरू आहे. विशेष म्हणजे या गोळ्यांची मूळ किंमत ४० रुपये असताना, त्यांची काळ्या बाजारात तब्बल ४०० ते ८०० रुपयांपर्यंत विक्री होते. त्यातही या प्रकारच्या गोळ्या वैद्यकीय सल्ला आणि प्रिस्क्रिप्शन असल्यावरच दिल्या जाणे अपेक्षित असतानाही, प्रत्यक्षात मात्र ‘पैसे मोजा आणि हव्या तितक्या गोळ्या विकत घ्या’, असा काळाबाजार सुरू आहे. 

थेट सवाल-  ओ. एस. साधवानी, सहआयुक्त, अन्न औषध विभाग 
 
तर परवाना निलंबित करणार 
Q- शहरात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय काही झोपेच्या गोळ्यांची विक्री केली जात आहे... 
A- याबाबतआमच्याकडे अद्याप तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र, अशी कोणीही विक्री करत असल्यास तर त्याविरोधात नियमाप्रमाणे कारवाई करून परवाना रद्द करण्यात येईल.

 
Q- शहरातअसे गोळ्या विक्री रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार? 
A- याबाबत पाेलिसांच्या मदतीने विशेष मोहीम राबवून तपासणी करण्यात येईल. 
 
Q- नागरिकांनी याबाबत कोठे तक्रार करावी? 
A- शहरातअशा प्रकारच्या गोळ्यांचा काळाबाजार केला जात असेल तर नागरिकांनी अन्न औषध विभागाकडे तक्रार करावी. तक्रार अाल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल. 
 
बातम्या आणखी आहेत...