आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडासाठी मदत करायची तरी कशी?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - उत्तराखंडमधील आपद्ग्रस्तांना आर्थिक मदतीचे योगदान देऊ इच्छिणार्‍या नाशिककर नागरिकांना सोमवारी आलेल्या अनुभवाने मदत करायची तरी कशी? असे म्हणण्याची वेळ आली. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीत मदतीची रक्कम जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कोषागार कार्यालयात गेलेल्या नागरिकांना अशा प्रकारची मदत देण्यासाठी ट्रेझरी शाखेत कोणतीही स्वतंत्र यंत्रणाच अस्तित्वात नसल्याचा अनुभव आल्याने मदत स्वीकारण्यातही शासकीय यंत्रणेला रस नसल्याचाच प्रत्यय या नागरिकांना आला.

देशात पूर्वी कुठेही मोठी दुर्घटना झाली तर प्रभातफेर्‍या निघायच्या, नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरू व्हायचा. मात्र, सध्याच्या काळात समाजाच्या संवेदनाच बोथट झाल्या असल्याने आणि शासकीय यंत्रणांवरील विश्वासदेखील कमी झाला असल्याने सहजपणे कुणीही खिशाला तोशीस लागू देत नाही, हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत नाशिकरोडच्या सिन्नर फाट्यावरील सामनगावरोडवरील अश्विनी कॉलनीतील काही नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी कॉलनीत फिरून घरोघरी जाऊन स्वेच्छेनुसार उत्तराखंड राज्यातील नागरिकांसाठी मदतनिधीचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून नागरिकांकडून जमा झालेल्या 13 हजार 109 रुपयांमध्ये भर घालून 14 हजार रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनामार्फत पंतप्रधान मदत निधीला देण्याचा प्रयत्न केला.

खाते क्रमांकच माहीत नाही
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्टेट बॅँकेच्या कोषागार शाखेत या नागरिकांचे प्रतिनिधी पंतप्रधान निधीमध्ये पैसे जमा करण्यासाठी गेले. मात्र, उत्तराखंडसाठी मदतीकरिता कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसल्याचा अनुभव त्यांना आला. मदतीसाठी अद्याप कोणत्याही प्रकारचा खाते क्रमांक बॅँकेला प्राप्त झाला नसल्याचे शाखा व्यवस्थापकांनी सांगितले. या नागरिकांमध्ये स्वप्निल घिया, जितेंद्र भावे, जगबीर सिंग, अनिता गिते, सविता सातपुते, माधवी भाबे, मंगल खराडे, मनीषा भावे यांचा सहभाग होता.

संकेतस्थळावरून शोधला खाते क्रमांक
नागरिकांकडून मदतीचा तत्पर प्रतिसाद मिळत असूनही ती स्वीकारण्यासाठी यंत्रणाच नसल्याचा अनुभव आम्हाला आला. आमच्या गटातील काही महिलांनी इंटरनेटवरून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीचा खाते क्रमांक शोधून दिला. त्यानंतर इ-ट्रान्सफरद्वारे हा 14 हजारांचा निधी या खात्यावर जमा करण्यात आला. जितेंद्र भावे, सामाजिक कार्यकर्ते