आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर शहारे अन् डोळ्यात पाणी..; केदारनाथमधील स्थिती आजही विदारक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केदारनाथमधील जलप्रलयानंतर यात्रेकरूंना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यात आले असले तरी स्थानिकांचे जीवन हालअपेष्टांनी भरलेले राहणार आहे. निसर्गाने घातलेला हा घाव कधीही न विसरता येण्यासारखा आहे. भारत सेवार्शम संघ, नाशिकचे स्वामी परिपूर्णानंद त्या भागात चार शिबिरांद्वारे आपद्ग्रस्तांना भोजन उपलब्ध करून देत आहेत. स्वामीजींचे याच परिसरात पाच वर्षे वास्तव्य होते. जलप्रलयानंतर ते गौरीकुंड व परिसरात मदतकार्यासाठी गेले होते. त्यांनी विशद केलेली तेथील विदारक स्थिती.


17 जूनच्या जलप्रलयात भारत सेवार्शम संघाची के दारनाथ येथील चार मजली धर्मशाळेची इमारत वाहून गेली. या इमारतीत देशभरातून आलेले 170 यात्रेकरू, आमचे एक संन्यासी व दोन स्वयंसेवक होते. गौरीकुंड येथील दोन सात मजली इमारतीही वाहून गेल्या. त्यातही 200 यात्रेकरू, एक स्वामीजी व तीन स्वयंसेवक होते. त्यांच्यापैकी फक्त दोन लोक वाचू शकले. या इमारतींची एक वीटही आज शिल्लक राहिलेली नाही.

संघाने दुसर्‍याच दिवसापासून मदतकार्य सुरू केले; पण त्यात अनेक अडथळे आले. केदारनाथकडे जाणारे सर्व रस्ते तुटलेले असल्याने तेथे पोहोचणे अशक्य होते. अन्नधान्य, भाजीपाला सर्व मदत जमा झालेली; पण पोहोचविणार कशी, हा आमच्यासमोर प्रश्न होता. मग भारतीय सैन्याची मदत आम्हाला मिळाली. सर्व रसद त्यांनी नेऊन पोहोचविली. त्यानंतर आम्ही गौरीकुंड, हृषिकेश, जोशीमठ, गुप्तकाशी, बद्रिनाथ येथे शिबिरे सुरू केली आहेत. प्रत्येक शिबिरात दररोज सात-आठ हजार लोकांना दोन्ही वेळेस भोजन दिले जात आहे. उत्तर प्रदेशातून आम्ही सात हजारांवर साड्या व 35 हजारांवर धोतरांची खरेदी करून ती स्थानिक लोकांपर्यंत पोहोचविली. देशभरातील 250 स्वयंसेवक या चार शिबिरांत रात्रंदिवस काम करीत आहेत.

आजची केदारनाथ, गौरीकुंड या परिसराची स्थिती अत्यंत गंभीर आहे. फक्त स्थानिक लोकच आता येथे उरले आहेत. पुराच्या पाण्यात घरेच नाही, तर आप्तही वाहून गेलेत. केदारनाथसह परिसरात अनेक ठिकाणी आजही मृतदेह पडून आहेत. पर्वतरांगांतील अनेक गावांपर्यंत अजूनही कोणी पोहोचलेले नाही. हे लोक जिवंत तरी आहेत का? हे सांगता येणे कठीण आहे. गौरीकुंड ते केदारनाथ अशी यात्रेकरूंची वाहतूक करणारी जवळपास 800पेक्षा जास्त गाढवे-खेचरेही शिल्लक राहिलेली नाहीत. वाचलेल्या स्थानिक लोकांना राहायला घरे नाहीत, खायला अन्न नाही अशी स्थिती आहे. आम्ही या परिसरातही मदत करीत आहोत. लोकांना दीड हजार रेनकोट खरेदी करून वाटले आहेत. जितकी मदत करता येणे शक्य आहे, ती आम्ही करतो आहोत. सरकारी आकड्यांपेक्षा कितीतरी अधिक म्हणजे किमान 10 ते 12 हजार लोक या आपत्तीत मृत्युमुखी पडले असावेत.