आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरायणाच्या संगतीने शुभ पर्वाला सुरुवात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सूर्यदेव त्यांच्या पुत्राच्या म्हणजेच शनि महाराजांच्या मकरराशीत रविवारी प्रवेश करीत असल्याने त्यावेळी उत्तरायणाला सुरुवात होणार आहे. संक्रांत म्हणून ओळखल्या जाणा-या या दिवशी या दिवशी या पिता-पुत्रांची भेट होत असल्याची श्रध्दा आहे. संक्रांतीपासून सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते आहे. शहरासह जिल्ह्यातही रविवारी संक्रांतीचा उत्साह दिसून येणार आहे.
इच्छामरणाचे वरदान असणा-या भीष्म पितामहांनीही शरीराचा त्याग करण्यासाठी याच दिवसाची निवड महाभारत काळात केली होती यावरून या दिवसाचे महत्त्व लक्षात यावे. उत्तरायणात देहत्याग झाला तर त्या व्यक्तीला जन्म-मृत्यूच्या फे-यात अडकून पडावे लागत नसल्याचे भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याने उत्तरायाणाचे महत्त्व भारतीयांमध्ये आहे. उत्तर भारतात प्रयाग, काशी, हरिद्वारमध्ये गंगास्नान करून खिचडी दान करण्याची प्रथा आहे.
पतंग उडवण्याची प्रथा
भारतासोबतच चीनमध्येही उडवण्यात येणा-या पतंगाला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. चीनमधून पतंग उडविण्याला सुरुवात झाल्याची मान्यता आहे, तर रामायणकाळात पतंग उडवण्यास सुरुवात झाल्याची मान्यता आहे. याबाबतचा उल्लेख तुलसीदासरचित रामचरितमानसच्या बालकांडातही आढळतो. प्रभू रामचंद्रांनीही त्यांच्या सहकार्यांसोबत पतंग उडविल्याचे यात म्हटले आहे. श्रीरामांची ही पतंग इंद्रलोकात गेल्यानंतर इंद्राच्या सुनेने ही पतंग पकडली. हनुमंत पतंग आणण्यासाठी गेले असताना त्यांना पतंग उडवणा-याचे दर्शन घेतल्याशिवाय ती परत करणार नसल्याचा हट्ट धरला. हनुमंताने श्रीराम दर्शन घडवण्याचे आश्वासन तिला दिल्यानंतर प्रभूंची पतंग परत मिळाल्याचा उल्लेख यात वाचायला मिळतो.
संक्रांतीच्या तीन देवता
सूर्य, शिव आणि बृहस्पती या शास्त्रानुसार संक्रांतीच्या तीन देवता आहेत. या दिवशी लक्ष्मीप्राप्ती आणि रोगनाशासाठी सूर्यपूजेला महत्त्व आहे. शत्रुनाश आणि कष्टनिवारणासाठी शिव आणि यश, सन्मान, ज्ञान, विद्येसाठी बृहस्पतीच्या पूजनाला महत्त्व आहे.
संक्रांतीशी निगडित खास गोष्टी
> महाराष्ट्रात नवविवाहिता पहिल्या संक्रांतीला कापूस, तेल, मीठ आदी वस्तू सौभाग्यवतींना दान करतात. यानिमित्त हळदी-कुंकवाचेही आयोजन करण्यात येते.
> जम्मू,काश्मीर आणि पंजाबमध्ये संक्रांतीला लोहाडी म्हटले जाते. कंसाने कृष्णाला मारण्यासाठी लोहिता नावाच्या राक्षशिणीला पाठविले. पण, कृष्णाने तिचा वध केला यावरून लोहाडी नाव पडले.
> सिंधी लोक संक्रांतीला लाल लोही म्हणून ओळखतात.
> तामिळनाडूत हा सण पोंगल म्हणून साजरा होतो. तेथे लोक कृषीदेवतेच्या पूजनासाठी नव्या धान्यापासून पदार्थ बनविण्यास सुरुवात करतात.
> आसाममध्ये माघ बिहू किंवा भोगाली बिहू म्हणून संक्रांत ओळखतात.
> राजस्थानमध्ये सवाष्ण स्त्रिया सासूला वाण देऊन आशीर्वाद घेतात.
> याच दिवशी गंगा भगीरथाच्यामागे आली. कपिलमुनींच्या आश्रममार्गे पुढे सागरात विलीन झाली.
यासाठी बनवितात खिचडी
गुरु गोरक्षनाथ शिष्यांसोबत तिर्थक्षेत्री थांबलेले असताना शिष्यांया संख्येच्या तुलनेत खाण्या-पिण्याची साधन सामग्री कमी होती. गुरु गोरक्षनाथांनीच शिल्लक राहीलेल्या तांदूळ, तीळ, दाळ, हळद आणि मीठ या वस्तूंपासून पदार्थ बनवायला लावला. यापासून बनविलेला पदार्थ खिचडी म्हणून प्रसिध्द झाला. तेव्हापासून संक्रांतीला खिचडी बनविण्याची प्रथा आहे.

उत्तरायण-दक्षिणायनाचे महत्त्व
दक्षिणायनात सर्व शुभकार्य हे शास्त्रानुसार बंद असतात. उत्तरायणाला देवांचा दिवस म्हणून ओळखले जात असल्याने याच कालावधीत शुभकार्यांची सुरुवात होते, तर दक्षिणायनाला देवतांची रात्र मानली जात असल्याने याला राक्षसांचा कालावधीही मानला जातो.