आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानमंदिरासोबतचे न फिटणारे ऋण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सावाना कविवर्य कुसुमाग्रजांचं दृढ नातं सर्वश्रुत अाहे. अाज वाचनालय ज्या जागेत उभे अाहे ते कुसुमाग्रजांच्याच प्रयत्नाने. राज्य शासनाकडून यास हायस्कूल क्रीडांगणावरील जागा विनामूल्य मिळाली. ३१ मे १९६२ राेजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते इमारतीची काेनशिला बसविण्यात अाली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष कविवर्य कुसुमाग्रज म्हणाले, 'स्वातंत्र्यानंतर परिस्थिती पालटेल असे वाटले हाेते, पण अाज सरस्वतीच्या हाती वीणेएेवजी झोळी अाली अाहे.' या उद््गाराचा उल्लेख करून यशवंतराव भावपूर्ण शब्दांत म्हणाले, 'कविराजांनी इच्छा व्यक्त केल्यावर तर झाेळी रिकामी राहणारच नाही. तुमची चार लाखांची याेजना अाहे, निम्मे तरी गावाने जमवावे.' पुढे यशवंतराव देशाचे संरक्षणमंत्री झाले, पण त्यांनी दिलेला शब्द पाळला. त्यावेळचे महाराष्ट्राचे अर्थमंत्री स. गाे. बर्वे यांना सांगून एक लाख रुपयांची व्यवस्था केली पुढील वर्षी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना साकडे घालून अाणखी एक लाख रुपयांची मदत झाली अाणि वाचनालय उभे राहिले. कुसुमाग्रज १९६२ पासून १९७२ पर्यंत वाचनालयाचे अध्यक्षही हाेते. अापले वाचन वाचनालयाबद्दल ते लिहितात...

ना शिकच्या सार्वजनिक वाचनालयाशी माझा संबंध आला तो पुस्तक पळविणारा म्हणून. माध्यमिक शाळेत शिकण्यासाठी मी तेव्हा नाशिकला आलो होतो. माझा मुक्काम दत्तोपंत जानोरकर या माझ्या मामांकडे होता. सरकारी नोकरीत असूनही त्यांना सार्वजनिक कामाची खूपच आवड होती. ते सार्वजनिक वाचनालयाचे क्रियाशील सभासद नव्हते, तर प्रमुख कार्यवाहच होते. विद्यार्थीवर्गासाठी असलेली सवलतीची चार आणे वर्गणी भरून त्यांनी मला सभासद केले होते. छोट्या गावातून आल्यामुळे वाचनालय म्हणजे काय आणि सभासदत्व म्हणजे काय याची पुरेशी माहिती मला नव्हती. मामांनी सांगितलं, तू वाचनालयात जा आणि पुस्तकं वाचायला आणत जा'. त्याप्रमाणे एके दिवशी मी वाचनालयात गेलो तेव्हा वाचनालय आज चित्रमंदिर सिनेमागृह आहे त्या जागेवर होते. पुस्तकांनी भरलेली कपाटं आणि कपाटांनी भरलेला तो मोठा थोरला दिवाणखाना पाहून मी थक्कच झालो. गांगरूनही गेलाे. यातून आपण पुस्तक कसं घ्यायचं? कोणत्या कपाटातून? वाचकांची गर्दी होतीच आणि एक गृहस्थ कपाट उघडून त्यांना पुस्तकं काढून देत होता. हाच आपला त्राता आहे हे लक्षात घेऊन मीही हिंडू लागलो. हे गृहस्थ बहुधा बागाईतकर असावेत. ज्यांनी आयुष्यभर वाचनालयाची अतिशय मनोभावे आणि इमानइतबारे सेवा केली, त्यांनी माझा नवखेपणा ओळखला आणि कोण, काय चौकशी करून विद्यार्थीवयात वाचायला योग्य असे एक पुस्तक माझ्या हातात दिलं. 'जा हे घेऊन' म्हणून त्यांनी सांगितलं आणि ते इतर वाचकांकडे वळले. मी पुस्तक घेतलं आणि सरळ घरी आलो. पुस्तक नोंदवायचं वगैरे असतं हे मला माहीतच नव्हतं. पंधरा-वीस दिवसांनी मामांनी चौकशी केली. त्या संवादातून त्यांना कळलं की, मी पुस्तक नोंदवलंच नाही. त्यांनी आदेश दिला, 'ताबडतोब वाचनालयात जा, पुस्तक परत कर, नोंद करता पुस्तक आणणं म्हणजे पुस्तक पळवणं-चोरणं आहे.' आपल्याकडून एक घोर अपराध घडला आहे. या भावनेनं मी वाचनालयात गेलो आणि पुस्तक परत केलं. पुस्तक देणाऱ्या त्या गृहस्थानं बागाईतकरांनी मला एकूण कार्यपद्धती समजावून सांगितली आणि दुसरं पुस्तक दिलं. ते मी नोंदवलं. नोंदबुकात सही केली. कायदेशीर सही करण्याचा तो पहिलाच प्रसंग. पुढील काळात मी मामांचं घर सोडलं आणि वाचनालयानंही आपलं घर बदललं. दत्तोपंतांच्या चिटणीसी कारकीर्दीत आणि त्यांच्याच प्रयत्नानं वाचनालय सरकारवाड्यातील वरच्या मजल्यावर आलं. वाचनालयाच्या िवकासाला साहाय्यभूत झालेले 'स्थलांतर' ही एक ऐतिहासिक महत्त्वाची घटना होती आणि तिचं बरंचसं श्रेय दत्तोपंतांनाही होतं. मी बी. ए. होईपर्यंत आणि नंतरचाही काळ मुंबईला जाईपर्यंत वाचनालयाचा वाचनशील वर्गणीदार होतो. दिवसातून दोन-दोन तास वाचनालयात मासिकं, वृत्तपत्र, वाचण्यात घालवीत होतो; पण आठ दिवसांनी पुस्तक बदलून माझी वाचनाची तहानही भागवीत होताे. इंग्रजी पुस्तकं वाचण्याची सवय तेथेच जडली. वाचनालयातील इंग्रजी पुस्तकांचा संग्रह फार चांगला होता. गॉल्सवर्दी, बर्नार्ड शॉ, सिंज या थोर नाटककरांचा परिचय येथेच झाला, कॉनरॅड्, हॉलबेलसारख्या नामांकित कादंबरीकारांचे वाचन येथेच झालं. रहस्यकथेच्या प्रेमातही मी त्याच काळात पडलो. केव्हातरी एडगर् वॉलेसची कादंबरी हातात आली आणि त्या लेखनप्रकारात मी इतका गुंतलो की, वाचनालयात उपलब्ध असलेल्या वॉलेसच्या आणि ओपेनहिनसारख्या तत्सम लेखकांच्या शे-दीडशे कादंबऱ्या तरी मी वाचल्या असतील. मला आजही साथ करणारा विनोदी लेखकांचा बादशहा पी. जी. वुडहाऊस मला या वाचनालयात प्रथम भेटला. मी रहस्यकथा समजून घरी आणलं 'मॅन विथ टू लेफ्ट फीट'. तो एक कथासंग्रह होता आणि तोही रहस्यकथांचा नव्हे, तर विनोदी कथांचा. वुडहाऊसच्या लोकविलक्षण, निर्मळ, स्वच्छ विनोदविश्वात मी प्रथमत: प्रवेश केला. मी वुडहाऊसचा वाचकच नव्हे तर भक्त झालो. रहस्यकथांचं नातं सोडून मी वुडहाऊसच्या आनंदविश्वाचा रहिवासी झालो. वाचनालयात उपलब्ध असलेली त्याची सर्व पुस्तके वाचून काढली. हे सर्व आणि याहून खूप काही या वाचनालयानं मला दिलं आहे. केव्हा एकदा अॅँथ्रॉपॉलॉजी हा माझा कुतूहलाचा, वाचनाचा विषय झाला होता. त्या विषयावरील जगविख्यात पुस्तकंही मला येथेच मिळाली. मराठी, वाङ‌्मयक्षेत्रातील वाटचालीला या वाचनालयानं फार मोठ साहाय्य केलेलं आहे. ते ऋण फिटणारे आहे. सुमारे नऊ-दहा वर्षे या संस्थेचे अध्यक्षपद मला लाभले आणि याच काळात संस्था स्वत:च्या भव्य इमारतीत आली याचा माझा अभिमान वाटतो.