आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कार्यालयांत 208 पदे रिक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळवण - नाशिक जिल्ह्यातील मालेगावनंतर सर्वात जास्त शासकीय कार्यालये असणारा तालुका म्हणून ज्याची गणना केली जाते, त्या कळवण तालुक्यातल्या विविध शासकीय कार्यालयांत तब्बल 208 पदे रिक्त असल्याने आदिवासी बांधवांना आपल्या कामांसाठी वेळोवेळी चकरा माराव्या लागत असून, या पदांची भरती करण्याची गरज आहे.

आमदार ए. टी. पवार यांनी आदिवासी भागातील जनतेची कामे जलद व कमी वेळेत होण्यासाठी आणि नाशिकचे काम कळवण येथे होण्यासाठी उपविभागीय कृषी कार्यालय, पोलिस उपविभागीय कार्यालय, आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय, आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण विभागीय कार्यालय, आदिवासी विकास महामंडळ आदी कार्यालये आणून जनतेच्या सोयी-सुविधांसाठी या कार्यालयांची निर्मिती केली. परंतु, कुठल्याही कार्यालयात गेले असता, ‘साहेब, नाशिकला मीटिंगला किंवा साईटवर गेले आहेत,’ अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन नागरिकांची बोळवण केली जात असल्याचे चित्र तालुक्यात असून, यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

कळवण तालुक्यात सद्यस्थितीत तहसील कार्यालयात एकूण 20 पदे रिक्त असून, त्यात दोन मंडल अधिकारी, तीन लिपिक, पाच तलाठी आणि 10 कोतवाल अशी पदे रिक्त आहेत.उपजिल्हा रुग्णालयात एकूण मंजूर पदे 100 असून, 77 पदे भरलेली तर तब्बल 23 पदे रिक्त आहेत. यात वैद्यकीय अधिकारी वर्ग- 2 च्या 4 मंजूर पदांपैकी 3 पदे भरलेली असून, एक पद रिक्त आहे. परिसेविकांच्या पाच पदांपैकी चार पदे भरलेली असून, एक पद रिक्त आहे. अधिपरिचारिकांची 27 पदे मंजूर असून, 15 पदे भरलेली तर 12 पदे रिक्त आहेत. तसेच, अपघात विभाग सेवकाची तीन पदे मंजूर असून, दोन भरलेली तर एक पद रिक्त आहे. कक्षसेवकाची 10 पदे मंजूर असून, पाच पदे भरलेली असून, पाच पदे रिक्त आहेत. वनोपचार विभागातील एक पद रिक्त असून, शिपाई संवर्गातील दोन मंजूर पदांपैकी एक पद भरलेले तर एक रिक्त आहे. प्रशासकीय अधिका-याचेही पद रिक्त आहे. वरिष्ठ लिपिकाचे एक पद असून, तेदेखील रिक्त आहेत.

पवार यांच्या वक्तव्याने संभ्रम
आदिवासी जनतेला एकाच ठिकाणी अधिकारी भेटावे व काम कमी वेळेत व्हावे, यासाठी आमदार ए. टी. पवार यांनी येवल्याच्या धर्तीवर आदिवासी उपाययोजनेतून मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाला सहा कोटी रुपये मंजूर करून नुकतेच काम पूर्ण होऊन लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनही केले होते. यामुळे तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये असलेल्या सोयी-सुविधांचा अभाव दूर झाला असल्याचे व हक्काच्या जागेत स्थलांतर होण्याचे स्वप्न अधिका-यांना व कर्मचा-यांना पडले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी आमदार ए. टी. पवार यांनी या इमारतीत शासकीय कार्यालये जाणार नसल्याचे सांगून या ठिकाणी शासनाचे पॉलटेक्निक कॉलेज सुरू होणार असल्याची माहिती दिल्याने तालुक्यातील जनता व शासकीय कर्मचा-यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण केली आहे. मात्र, पवार यांच्या या निर्णयाने कळवण शहरातील व्यापारी बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.

पंचायत समितीअंतर्गत 1094 पदे मंजूर पण...
कळवण पंचायत समितीच्या विविध विभागांमधील एकूण मंजूर पदे 1094 असून, 1068 पदे भरलेली तर 26 पदे रिक्त आहेत. त्यात सामान्य प्रशासन विभागात 61 मंजूर पदांपैकी 56 पदे भरलेली तर 5 पदे रिक्त आहेत. परिचरांची 68 पदे मंजूर असून, 59 पदे भरलेली तर 9 पदे रिक्त आहेत. पशुसंवर्धन विभागात 34 मंजूर पदे असून, 33 पदे भरलेली तर 1 पद रिक्त आहे. लघुपाटबंधारे विभागात 8 मंजूर पदांपैकी 7 पदे भरलेली तर अनुरेखकाचे 1 पद रिक्त आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पातील 6 मंजूर पदांपैकी 5 भरलेली तर 1 रिक्त आहे. ग्रामपंचायत विभागाकडील 87 पैकी 86 पदे भरलेली असून, 1 पद रिक्त आहे. शिक्षण विभागातील शिक्षकांची 635 पदे मंजूर असून, 627 भरलेली तर 8 पदे रिक्त आहेत. पंचायत समितीच्या कृषी अधिका-याचे एक पद रिक्त असून, कृषी विभागात अनुरेखकाची 3 पदे रिक्त आहेत.

कृषी कार्यालयातही अशीच अनास्था
तालुका कृषी कार्यालयात 5 पदे रिक्त असून, यामध्ये कनिष्ठ लिपिकाची एक जागा रिक्त आहे. कळवण व कनाशी मंडल विभागात शिपायाची दोन पदे रिक्त आहेत, तर कृषी सहायकाची दोन पदे रिक्त आहेत.

विविध शासकीय खात्यांची अशी ही त-हा
भूमी अभिलेख कार्यालयात एकूण 15 पदे असून, त्यापैकी लिपिक 3 व शिपाई 2 अशी 5 पदे रिक्त आहेत. कळवण वनविभागात 2 वनपाल व 3 वनरक्षक अशी 5 पदे रिक्त आहेत. पाटबंधारे विभाग सिंचनमध्ये 69 पदे असून, 22 पदे रिक्त आहेत. ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प कार्यालय येथे 21 पदे मंजूर असून, 11 पदे रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग तिन्ही विभागात 91 कर्मचारी असून, त्यापैकी 16 पदे रिक्त आहेत.

आदिवासी विकास विभागातील रिक्त पदे अशी
कळवणच्या आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयांतर्गत 75 पदे असून, त्यापैकी 31 पदे रिक्तआहेत. यामध्ये कनिष्ठ लिपिक - 8 पदे, वरिष्ठ लिपिक 4, उपलेखापाल 2, सांख्यिकी सहायक 1, लघुटंकलेखक 1, शिपाई 3, निरीक्षक 1, कनिष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी 8 पदे, सहायक प्रकल्पाधिकारी शिक्षण 3 अशी 31 पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे तातडीने भरण्याची मागणी केली जात आहे.
गतिमानताच येत नाही
- कळवणमध्ये सर्व शासकीय कार्यालये असली तरीही अधिकारी व कर्मचारी हे नाशिक येथे राहत असल्याने कार्यालयात ते 10 ते 12 च्या दरम्यान पोहोचतात व सायंकाळी 5 वाजताच परत निघण्याची तयारी करतात. यामुळे प्रशासनात गतिमानता येत नसल्याने नागरिकांची शासकीय कामे वेळेवर होत नाहीत. हर्षवर्धन पवार, नागरिक
अहवाल वरिष्ठांकडे
- कळवण तालुक्यातील शासकीय कार्यालयातील रिक्त जागांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असून, त्या लवकर भरण्यात येतील. तसेच, नागरिकांच्या कामात जर एखादा अधिकारी दिरंगाई करत असेल तर कारवाई करू. -आस्तिक पाण्डेय, प्रांताधिकारी