आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vacant Post News In Marathi, Police Officer Vacant Post Issue At Nashik, Divya Marathi

पोलिस अधिकार्‍यांची शहराला प्रतीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पोलिस आयुक्तालयात चार वर्षे सेवा पूर्ण केलेल्या वरिष्ठ निरीक्षकांसह उपआयुक्त, सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल्या केल्या आहेत. या अधिकार्‍यांना नव्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आयोगाचे आदेश असतानाही आयुक्तालयात केवळ दोनच अधिकारी दाखल झाले असल्याने उर्वरित जागांवर अधिकार्‍यांची प्रतीक्षाच करावी लागत आहे. यामुळे आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन होताना दिसत आहे.

गेल्या आठवड्यात आयोगाच्या सूचनेनुसार पोलिस महासंचालकांनी राज्यातील 400हून अधिक वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये आयुक्तालयातील नऊ वरिष्ठ निरीक्षकांसह दोन सहायक आयुक्त, उपआयुक्त यांच्या बदल्या झाल्या आहेत. यातील दोन अधिकारी वगळता सर्वच अधिकार्‍यांना पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी तत्काळ कार्यमुक्त केले. पंचवटी, आडगाव, गंगापूर, सरकारवाडा, नाशिकरोड, सातपूर, उपनगर पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांचा समावेश आहे. या सातही पोलिस ठाण्यांचा परिसर मोठा असून, नियमित गस्त अथवा वरिष्ठ निरीक्षक नसल्यास कायदा व सुव्यस्थेचा प्रश्नदेखील निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. तरीही इतर पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांनाच अतिरिक्त पदभार सोपवून कामकाज केले जात आहे. त्यात ज्या अधिकार्‍यांची नाशिक पोलिस आयुक्तालयात बदली झाली आहे, अशा डझनभर अधिकार्‍यांपैकी केवळ दोनच अधिकारी दाखल झाल्याने उर्वरित अधिकार्‍यांची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

अधिकार्‍यांचा फेररचनेला अडसर
आयुक्तालयातील तब्बल नऊ वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने त्यांच्या जागेवर सक्षम अधिकारी नियुक्त करण्यासाठी फेररचना करण्यात येणार आहे. यासाठी आयुक्तांकडून आढावा घेतला जात असला तरी कोणत्या पोलिस ठाण्यात कोणता अधिकारी प्रमुख म्हणून नियुक्त करायचा, याबाबत अडसर निर्माण होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.