आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅलेंटाइन प्रेमासाठी, क्रांतिदिन कशासाठी? नाशकातील तरुणाईला पडला प्रश्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘चले जाव’ची घोषणा करून इंग्रजी सत्तेला भारताबाहेरचा रस्ता दाखविणार्‍या क्रांतिकारकांचाच नवयुवकांना विसर पडत असल्याची विदारक बाब ‘दिव्य मराठी’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. व्हॅलेंटाईन डे आणि फ्रेंडशिप डेची इत्थंभूत माहिती ठेवणार्‍या युवकांपैकी सुमारे 58 टक्के युवकांना क्रांतिदिन कधी असतो हेच ठाऊक नसल्याचे कटू सत्य समोर आले आहे. शिवाय 68 टक्के युवकांना क्रांतिदिन का साजरा केला जातो याचीदेखील माहिती नाही. शुक्रवारच्या क्रांतिदिनानिमित्त हे सर्वेक्षण करण्यात आले.

नुकताच फ्रेंडशिप डे जोरदारपणे साजरा झाला. यादिवशी हॉटेल्समध्ये गर्दी करणार्‍या ‘फ्रेंडशिप वेड्यां’नी फेसबुक आणि ‘व्हॉटस अँप’च्या भिंतीदेखील फुल्ल रंगविल्या होत्या. व्हॅलेंटाईन डे ला तर युवकांचा उत्साहाला पारावर उरत नाही. याच युवकांना भारताच्या इतिहासाची किती जाण आहे, क्रांतिदिनाकडे ते कोणत्या नजरेने बघतात हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने 20 ते 25 वयोगटातील युवकांकडून एक प्रश्नावली भरून घेतली. त्यात फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेंटाईन डेची माहिती असणारे बहुतांश युवक आढळले. दुर्दैवाने क्रांतिदिनाची माहिती केवळ 32 टक्केच युवकांना असल्याचे निदर्शनास आले. भारताचा स्वातंत्र्यदिन कधी असतो याची माहिती नसणार्‍या ‘महाभागां’ची संख्या 24 टक्के असल्याचेही याच सर्वेक्षणात आढळून आले.

सर्वेक्षण विद्यार्थी नेत्यांचे
>फ्रेंडशिप डे ची योग्य माहिती- 100टक्के
>स्वातंत्र्यदिनाची योग्य माहिती- 100 टक्के
>क्रांतिदिनाची योग्य माहिती देणारे- 80टक्के
>15 ऑक्टोबरला क्रांतिदिन म्हणणारे- 20टक्के
>जॅक्सनच्या वधाला क्रांतिदिन म्हणणारे- 30 टक्के
>संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे क्रांतिदिन म्हणणारे- 20 टक्के

‘चले जाव चळवळ’ माहिती असणारे- 50 टक्के


विद्यार्थिनेत्यांचीही अवस्था बिकट
युवकांना क्रांतिदिनाची माहिती नसल्याची बाब उघडकीस आल्यानंतर आम्ही शहरातील काही विद्यार्थिनेत्यांचेही सर्वेक्षण केले. मात्र, त्यातही खूप सुकर चित्र दिसले नाही. महाविद्यालयीन निवडणुकांसाठी आकांडतांडव करणार्‍या विद्यार्थी नेत्यांपैकी सर्वेक्षणानुसार सुमारे 50 टक्के नेत्यांना क्रांतिदिनाचा संदर्भच माहीत नाही, तर 20 टक्के नेत्यांना क्रांतिदिन कधी असतो ते माहीत नाही.

का साजरा केला जातो क्रांतिदिन?
इंग्रजांना भारतातून घालविण्यासाठी महात्मा गांधींनी ‘चले जाव’ची घोषणा दिली. त्यानंतर महात्मा गांधींना अटक झाली. 9 ऑगस्ट 1942 मध्ये मुंबईतील आझाद मैदानावर कॉँग्रेसचे अधिवेशन भरले. महात्मा गांधीजींनी केलेली ‘चले जाव’ची गर्जना आणि दिलेला ‘करेंगे या मरेंगे’ या मंत्राच्या पार्श्वभूमीवर दुसर्‍या फळीतील नेत्यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात क्रांतीची ज्योत पेटवली होती. त्यामुळे 9 ऑगस्ट हा क्रांतिदिन म्हणून ओळखला जातो.