नाशिक-‘मला वेड लागले.. प्रेमाचे’ हे गाणं गुणगुणत दिवसभर तरुणाईने ‘व्हॅलेंटाइन डे’चा जल्लोष केला. कॉलेजरोड आणि अन्य परिसरावर पोलिसांची करडी नजर असल्याने शहराबाहेरील सोमेश्वरसारख्या पर्यटनस्थळांवर प्रेमाच्या गप्पा फुलल्या होत्या. भेटवस्तूंची देवाणघेवाणही जोरात सुरू होती. काहीशा ‘सीनिअर’ झालेल्या मंडळींनी ‘तो टाइमपास नव्हता, आयुष्यातील घालवलेला बेस्ट टाइम होता’ असं मनोमनी म्हणत आपल्या ‘त्या वेळच्या’ व्हॅलेंटाइनच्या आठवणींना उजाळा दिला. सकाळी पोलिस बंदोबस्तामुळे काहीशा शांत असलेल्या कॉलेजरोड परिसरात मात्र सायंकाळी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.
शुक्रवारचा दिवस उगवला तो गुलाबी थंडी अन् ‘व्हॅलेंटाइन डे’चा संदेश घेऊन. कोणाच्या इनबॉक्समध्ये तर कोणाच्या व्हॉट्स अँपवर ‘हॅपी व्हॅलेंटाइन डे’चे संदेश आदळले आणि लगबगीने तरुणाई कॉलेजरोडसारख्या ‘हिरवळी’वर पोहोचली. मात्र, संपूर्ण कॉलेजरोडवर पोलिस बंदोबस्त असल्याने अनेकांनी या जागेवरून काढता पाय घेतला. कॉलेजच्या पाठीमागे गुलाबाची फुले भरलेला टेम्पोच उभा होता. मात्र, या टेम्पोजवळच पोलिस फिरत असल्याने या फुलांची खरेदी करण्याची हिंमत कोणी दाखवित नव्हते. अर्थात गुलाब विक्रेत्याने मात्र तीन हजार फुलांची विक्री झाल्याचा दावा केला. एक गुलाब तब्बल 20 रुपयांना विकला जात होता. परंतु, ‘आजच्या दिवशी खिशाचा नाही, तर फक्त तिचाच विचार करायचा’ या भावनेने हे 20 रुपयेदेखील अगदी सहजपणे खिशातून काढले जात होते.
कॉलेजरोडसह अन्य कॉलेजेसमध्येदेखील सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेकांनी पोलिसांचा हा ससेमिरा चुकविण्यासाठी सोमेश्वर, गोदापार्क, फाळके स्मारक यांसारख्या निसर्गरम्य परिसरांत जावून एकांती भेटणेच पसंत केले. हिरव्यागार वृक्षांच्या शीतल छायेत अनेकांच्या प्रेमाच्या गप्पा फुलल्या होत्या. याठिकाणी कुणी एकमेकांना आकर्षक गिफ्ट्स भेट देत होते, तर कुणी दूर एकांतात प्रेमाच्या आणाभाका घेत होते. सोमेश्वर येथे झालेल्या प्रेमी युगुलांच्या गर्दीमुळे खडकही बहरल्यागत दिसत होते. दरम्यान, व्हॅलेंटाइन डेनिमित्त शहरात प्रेमाचे प्रतिक समजली जाणारी विविध प्रकारची गुलाबाची फुलं दाखल झाली होती. एक फुलं तब्बल 20 रुपयांना विकले गेले.
भगतसिंग, राजगुरू अन् सुखदेव यांचीही आठवण
फेसबुक आणि व्हॉट्स अँपवर ‘व्हॅलेंटाइन डे’च्या सचित्र संदेशांचा दिवसभर अक्षरश: पाऊस पडत होता. वेगवेगळी ग्रीटिंग्स, वॉलपेपर्स एकमेकांसोबत शेअर केली जात होती. विशेष म्हणजे, शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन स्वातंत्र्यवीरांना फाशीदेखील 14 फेब्रुवारी रोजीच देण्यात आली होती. त्यामुळे या तिघांना व्हॉट्स अँपवर अनेकांकडून आदरांजलीही वाहिली जात होती. मात्र, त्याचबरोबर व्हॅलेंटाइन डे साजरा करावा का, असा प्रश्नही उपस्थित केला जात होता.