आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्पाळकरांच्या अंतरिम जामिनावर आज सुनावणी, ठेवीदारांच्या हितासाठी सेबीकडे पाठपुरावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मैत्रेयच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांच्यासह संशयित पाचही जणांच्या अंतरिम जामिनावर सोमवारी (दि. १८) सुनावणी होणार असून, या प्रकरणी पाेलिसांनी प्राथमिक तपासाच्या अाधारे साडेतीन हजार पानी दाेषाराेपपत्र दाखल केल्याने जामिनास मुदतवाढ मिळण्याची शक्यता अाहे. त्याचबराेबर कंपनीने एस्क्राे खात्यात अाणखी माेठी रक्कम जमा करण्याची तयारी दर्शविल्यास पाेलिसांकडूनही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला जाऊ शकताे. दरम्यान, मैत्रेयच्या भूमिकेकडे राज्यभरातील हजाराे ठेवीदारांचे लक्ष लागले अाहे.
राज्यभरातील हजाराे गुंतवणूकदारांना काेट्यवधींचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सत्पाळकर यांच्या तात्पुरत्या जामिनावर साेमवारी निर्णय हाेणार अाहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची हमी देत त्यासाठीचा अाराखडाही कंपनीने न्यायालयाला सादर केला. ठेवीदारांच्या रकमा परत करण्यासाठी न्यायालय अादेशानुसार कंपनी पाेलिसांचे संयुक्त एस्क्राे खाते उघडण्यात अाले अाहे. या खात्यात दाेन टप्प्यांत कंपनीने एक कोटी ४७ लाखांचा भरणा केला असून, कंपनीच्या इतर वेगवेगळ्या १२५ बँक खात्यांतील सुमारे ८० लाखांची रक्कम एस्क्रो खात्यात जमा करण्यात आली आहे. यातून सुमारे दाेन काेटी २५ लाख रक्कम खात्यात जमा झाल्याने गुंतवणूकदारांच्या अाशा पल्लवित झाल्या अाहेत. ही रक्कम मुदत पूर्ण झालेल्या ठेवीदारांना परत करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून न्यायालयाकडे परवानगी मागितली जाणार अाहे.

पाेलिसांनी सत्पाळकर यांच्यासह संचालक जनार्दन परुळेकर, अजय पठारे, ज्ञानेश्वर वैद्य अाणखी एका महिलेविरुद्ध पाच काेटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. त्यानुसार सत्पाळकर यांना अटक केल्यापासून ते अातापर्यंत केलेल्या तपासाचे दाेषाराेपपत्र अायुक्तांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ निरीक्षक डाॅ. सीताराम काेल्हे पथकाने दाखल केले अाहे. दाेषाराेपपत्रात ठेवीदारांचे जाबजबाब, कंपनीची मालमत्ता, कंपनीच्या कार्यालयांसह इतर व्यवसाय, बँक खाती, ठेवीदारांच्या रकमांचा समावेश अाहे.

^ एस्क्राे खात्यातील रक्कम ठेवीदारांना परत देण्यासाठी न्यायालयाची परवानगी मिळताच कार्यवाही हाेईल. वर्षभरापूर्वी मुदत पूर्ण हाेऊन पैसे मिळाले नाहीत अथवा दाेन वेळा धनादेश वटले नाहीत, अशांचा प्राधान्यक्रम ठरवून पैसे दिले जातील. मैत्रेयने अाणखी रक्कम जमा करण्याचे लेखी अाश्वासन दिल्यास पाेलिस सहकार्य करतील. त्यांच्या मालमत्ता विक्रीवर सेबीचे निर्बंध असले तरी या मालमत्ता विकून पैसे एस्क्राे खात्यात जमा करण्याचे न्यायालयासमाेर मान्य केल्यास पाेलिस निर्बंध उठविण्यासाठी पाठपुरावा करतील. कंपनीचे कुठलेही कार्यालय पाेलिसांनी बंद केले नसून, हा त्यांच्या व्यवस्थापनाचा निर्णय अाहे. -एस. जगन्नाथन, पाेलिसअायुक्त