आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच कोटी रुपये खर्च करून बांधलेला भाजीबाजार वादाच्या भोव-यात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रामकुंड परिसरात महापालिकेने बांधलेला पाच कोटी रुपयांच्या नवीन भाजीबाजारात जायला कोणताही विक्रेता तयार नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार नवीन बाजारामध्ये आमचा धंदा होणार नाही. त्यामुळे महापालिकेने बांधलेला नवीन भाजीबाजार सध्या बेवारस अवस्थेत पडलेला असल्याने अवकळा आली आहे.
दिवसभर येथे भिकारी पहुडलेले असतात. व्यसनी मंडळींसाठी या जागेचा वापर होत आहे. येथे सुरक्षिततेसाठी कोणतीच उपाययोजना नसल्याने ही धर्मशाळा बनली आहे. गंगाघाटावरील भाजीबाजाराने विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. गोदावरीच्या लगतच हा बाजार असल्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात साठला जाऊन नदीचे प्रदूषण होत आहे. गंगाघाटाच्या सौंदर्यालाही बाधा आली आहे. याची दखल घेत भाजीबाजाराचा प्रश्न सोडविण्यासाठी लगतच सुमारे पाच कोटी रुपये खर्चून भव्य भाजीबाजार संकुल उभारण्यात आले. बराच कालावधी लोटला असला तरीदेखील हा बाजार सुरू करण्यात प्रशासन व संबंधित वॉर्डाच्या नगरसेवकाला अद्याप यश आले नाही. या बाजारावर झालेला खर्च तूर्त वाया गेल्याचे दिसत आहे.
गंगाघाटावरील सध्याच्या भाजीबाजाराचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर भाजी विक्रेत्यांनी दैनंदिन कर गोळा केलेला असूनही महापालिका मात्र तो स्वीकारत नाही. त्यामुळे महापालिकेचे दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत स्थानिक पदाधिकारी व भाजीबाजार पदाधिका-यांनी योग्य तोडगा काढावा व विक्रेत्यांच्या प्रतिनिधींनी समंजसपणाची भूमिका घ्यावी, अशी मागणी गंगाघाटावरील काही भाजी विक्रेत्यांकडून होत आहे.
भाजी विक्रेत्यांचा हटवादीपणा - जवळपास शंभर वर्षांपासून हा भाजीबाजार येथे सुरू आहे. काही विके्रत्यांच्या तिस-या पिढीचे लोक येथे भाजी विक्री करीत आहेत. त्यातच रामकुंडावर दहावा, तेरावा हे कार्यक्रम सातत्याने होतात. धुणे धुण्यासाठी महिलाही मोठ्या संख्येने गर्दी करीत असल्याने भाजीविक्रीचा व्यवसाय चांगला होत असल्याने तेथून स्थलांतर करण्यास हे विक्रते तयार नाहीत. अनेक वेळा समजूत काढूनही त्यांची मानसिकता होत नसल्याने बाजार बांधूनही नदीच्या प्रदूषणाची समस्या जैसे थे च आहे.
पालिका अपिलात - भाजी विक्रेत्यांची कायमस्वरूपी सोय व्हावी, गंगाघाटाचा हा परिसर पर्यटकांना व्यवस्थित पाहता यावा, या हेतूने गंगाघाटावर हा भव्य बाजार बांधण्यात आला. परंतु बाजारात बसण्यास कोणीही विक्रेते तयार नाहीत. उलटपक्षी पालिकेविरुध्द संबंधित विक्रेते न्यायालयात गेले असता भाजी विक्रेत्यांच्या बाजूने निकाल लागल्याने पालिका या निर्णयाविरुध्द अपिलात गेली आहे. - आर. एम. बहिरम, उपआयुक्त महापालिका