आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदाकाठावरील भाजीबाजार हटविण्याचे न्यायालयाचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गोदावरी प्रदूषणाला हातभार लावणारा तसेच सिंहस्थांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासाठी अडचणीचा ठरणारा गंगेवरील भाजीबाजार हटविण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने शनिवारी महापालिकेला दिले. दरम्यान, उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिकाकर्त्यांनी मुदत देण्याची मागणी केल्यावर दहा दिवसांकरिता स्वत:चाच निर्णयही जिल्हा न्यायालयाने स्थगित ठेवला.
२००५ पासून गंगेवरील भाजीबाजाराचा वाद प्रलंबित आहे. भाजीबाजारामुळे गोदावरीचे प्रदूषण होते. तसेच येथील अस्वच्छतेमुळे येणाऱ्या भाविकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच त्यामुळे भाविकांनाही अस्वच्छ नाशिकचे दर्शन घडते, असे आक्षेप घेत महापालिकेने भाजीबाजार हटविण्याचा पवित्रा घेतला होता. तत्कालीन आयुक्त विमलेंद्र शरण यांनी पाण्याचा मारा करून तसेच बॅरिकेड‌्स टाकून भाजीबाजार हटवला होता. दरम्यान, २००७ मध्ये गंगामाई भाजी विक्रेता संघाने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर भाजीबाजार हटविण्याच्या मोहिमेवर सुनावणी सुरू झाली. २०११ मध्ये न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली.
दरम्यान, महापालिकेने जिल्हा न्यायालयात अपील केल्यानंतर त्यावर सुनावणी सुरू होती. दुसरीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजीबाजार हटवणे गरजेची बाब बनली होती. पालिकेने या प्रकरणात रस घेऊन जोरदार युक्तिवाद केला. त्याचा परिणाम म्हणून िजल्हा न्यायालयातील न्यायमूर्ती ब्रह्मे यांनी गंगेवरील भाजीबाजार हटविण्यावरील स्थगिती उठवली. पालिकेकडून वकील व्ही. व्ही. पारख यांनी कामकाज बघितले.

याचिकेसाठी दहा दिवस निर्णय स्थगित

गंगामाई भाजी विक्रेता संघाने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली. त्यावर पुन्हा दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने दहा दिवसांपर्यंत स्वत:च्या निर्णयाला स्थगिती दिली. तोपर्यंत याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग माेकळा झाला आहे.
१० कोटी रुपयांची वास्तू पडून...
गणेशवाडीच्या कोपऱ्यावर १० कोटी रुपये खर्च करून पर्यायी भाजीमंडई बांधली आहे. मात्र, विक्रेत्यांनी याठिकाणी स्थलांतरित होण्यास नकार दिला होता. परिणामी, सद्यस्थिती या मंडईचा ताबा भिकारी, गर्दुल्ले अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी घेतला आहे.
बातम्या आणखी आहेत...