आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या कोथिंबिरीची सुरतेवर स्वारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रोजच्या जेवणात स्वादासाठी वापरली जाणारी कोथिंबीरसुद्धा आता महागाईच्या शर्यतीत उतरली आहे. कोथिंबिरीच्या चढय़ा भावाचे सर्व विक्रम मोडीत काढत मंगळवारी नाशिकच्या बाजार समितीत एका व्यापार्‍याने कोथिंबिरीच्या 100 जुड्यांसाठी चक्क 34 हजार रुपये मोजले!

तब्बल 340 रुपयांची ही जुडी सुरतकडे रवाना झाली. या कोथिंबीरला बडोदा (गुजरात) येथे अपेक्षेइतका भाव मिळाला नाही. त्यामुळे व्यापार्‍यांनी खरेदी थांबविली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीला शेकडा 34 हजार रुपये असा ‘न भूतो..’ असा विक्रमी भाव मिळाल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. अकोले तालुक्यातील देवठाण येथील शेतकरी संजय किसन दराडे यांनी ही कोथिंबीर विक्रीसाठी आणली होती. सायंकाळी झालेल्या लिलावात हा भाव मिळाला.

मंगळवारी चढय़ा दराने विक्री झाल्याने शेतकर्‍यांनी बुधवारी मोठय़ा प्रमाणात कोथिंबीर विक्रीसाठी आणली होती. पर्यायाने भावात मोठय़ा प्रमाणात घसरण झाली. कोथिंबीरीचे भाव शेकडा 34 हजारावरुन पाच ते सहा हजारापर्यंत खाली घसरला.

का वाढला कोथिंबिरीचा भाव?

सध्या पावसाळी वातावरण असल्याने भाजीपाला लवकर खराब होत आहे. त्यामुळे कोरड्या भाज्या खरेदीकडे व्यापार्‍यांचा कल असतो. त्यातच मागणी असेल तर व्यापार्‍यांमध्ये स्पर्धा लागून भाव वाढतो. त्याचाच भाग म्हणून हा विक्रमी भाव मिळाला.