आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लाइव्ह रिपोर्ट : ‘वाहन फिटनेस’वरून ‘आरटीओ’त रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तुमच्या वाहनांच्या डाव्या बाजूची लाईट थोडी खाली आहे... तुमच्या वाहनांची लाईट वरती आहे... तुमच्या वाहनात हवा कमी आहे... अशा किरकोळ कारणांवरून ‘आरटीओ’तील स्वयंचलित वाहन चाचणी आणि परीक्षण केंद्रात फिटनेस टेस्टसाठी आणलेली वाहने अपात्र ठरविली जात असल्याचा प्रकार पंधरा दिवसांपासून घडत असल्याने अखेर बुधवारी (दि. ४) वाहनधारकांचा संयम सुटून ‘आरटीओ’त चांगलेच रण माजले. किरकोळ कारणांवरून अडवणूक झाल्यावर सकाळी १० वाजेपासून वाहनांच्या फिटनेससाठी आलेल्या चालक मालकांनी उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना घेराव घातला. तर, संतप्त झालेल्या एजंट वाहनमालकांनी चक्क चाचणी केंद्र बंदच करायला लावले. सकाळी १० वाजेपासून सुरू असलेला गोंधळ रात्री वाजता संपला. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने ‘आरटीओ’ कार्यालयातील दिवसभराच्या घटनेचा केलेला लाइव्ह रिपोर्ट...

रिक्षा-टॅक्सी याप्रमाणेच सर्व सार्वजनिक वाहनांना दर वर्षी फिटनेस चाचणीला सामोरे जावे लागते. आतापर्यंत काही अंतर गाडी चालवून, त्या गाडीची कागदपत्रे तपासून ही चाचणी घेतली जात होती. मात्र, राज्यातील पहिली अद्ययावत फिटनेस चाचणी यंत्रणा नाशकातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात बसविण्यात आली आहे. पण, गेल्या काही महिन्यांपासून या चाचणी केंद्रात अनेक वाहनांना किरकोळ कारणावरून अपात्र करण्याचा प्रकार सुरू असल्यामुळे बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठा गदारोळ झाला.

रिक्षामालक चालक, टॅक्सीचालक मालक, लक्झरी बसमालकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या कार्यालयात धाव घेऊन फिटनेस चाचणी केंद्रात सुरू असलेल्या सर्व प्रकराबाबत माहिती देऊन तत्काळ केंद्र बंद करून केंद्रचालकांवर कारवाईची मागणी केली. तसेच, वारंवार वाहन दुरुस्ती करूनही फिटनेसमध्ये अपात्र ठरवत असल्यामुळे एजंट, वाहनचालक मालकांनी फिटनेस चाचणी केंद्रात गोंधळ घालून तेही बंद पाडले. कार्यालयात मोठ्या संख्येने गर्दी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, जोपर्यंत फिटनेस केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय शासन घेणार नाही, तोपर्यंत कार्यालयातून उठणार नसल्याची भूमिका वाहनचालकांकडून घेण्यात आल्याने रात्री उशिरापर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयात तणाव निर्माण झाला होता. पंचवटी पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन तेथील परिस्थिती पुरेशा नियंत्रणात आणली.

तपासणीबाबतच शंका
चारएकर जागेवर उभारण्यात आलेल्या या चाचणी केंद्रात एका गाडीची फिटनेस चाचणी होण्यासाठी किमान १२ ते कमाल १५ मिनिटे एवढा कालावधी लागतो. तसेच, या केंद्रात लहान गाड्यांपासून ते मोठ्या ट्रकपर्यंत सर्व वाहनांची चाचणी केली जाते. या केंद्रात ब्रेक चाचणी, चाकांची स्थिती, एक्झॉस्ट एमिशन, रिक्षा-टॅक्सी मीटर चाचणी आदी चाचण्या यंत्रांद्वारे केल्या जातात. मात्र, या यंत्रणेद्वारे गेल्या दोन महिन्यांपासून १०० पैकी ७० वाहनांना अपात्र प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे यंत्रणेच्या तपासणीवर शंका व्यक्त केली जात आहे.

दंड रद्द करण्याची मागणी
‘आरटीओ’तील फिटनेस चाचणी केंद्राबाबत बुधवारी काही वाहनमालक चालकांनी तक्रारी केल्या आहेत. संबंधितांनी केलेल्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या जातील. तसेच, फिटनेस चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यानंतर लागणाऱ्या दंडाची वसुली रद्द करण्याची मागणीही वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. भरतकळसकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
बातम्या आणखी आहेत...