तुमच्या वाहनावर तीन अंकी नंबर आहे. तो चार अंकी का टाकला नाही? तीन अंकांच्या सुरुवातीला शून्य वाढवून तो चार अंकी करायला हवा. तुमचा हा टाकलेला तीन अंकी नंबर नियमबाह्य आहे. तुम्हाला दंड भरावा लागेल. कागदपत्र दाखवा. लायसन्स दाखवा, अशी एका मागून एक प्रश्नांची सरबत्ती करत चार अंक पूर्ण करण्यासाठी केवळ नंबर प्लेटवर शून्य टाकल्याने लागलीच दंडाची पावती फाडणार्या पोलिसदादांच्या वाहनांवर मात्र कुठेही शून्य दिसत नाही. सर्वच वाहनांवर तीन अंकीच नंबर टाकले आहेत. विशेष म्हणजे, असा शून्य टाकावा याची कायद्यात तरतूद नसतानाही वाहनचालकांकडून पाेलिस पैसे उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘डी.बी. स्टार’च्या निदर्शनास आला आहे. त्यांच्या या दुटप्पी भूमिकेवर टाकलेला हा प्रकाशझोत...
रहदारी च्याठिकाणी वाहतूक सुरळीत राहावी, वाहतूक नियमांचे उल्लंघन वाहनधारकांकडून होऊ नये, ही वाहतूक पोलिसांची जबाबदारी. परंतु, वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमणूक केलेल्या पोलिसदादांनाच कायद्याची माहिती नाही. शिवाय सर्वसामान्य वाहनधारकांकडून तीनअंकी नंबर असल्याचे कारण देत दंड वसूल केला जात असताना त्यांच्या वाहनांवर तीन अंकी नंबरप्लेट लावण्यात आल्या आहेत. वाहनधारकांना उगाचच दंडाचा भुर्दंड सोसावा लागत असल्याने, हा दंड का अशी साधी विचारणा केल्यानंतर मात्र पोलिसांचा पारा चढताे. ‘तू कोण आम्हाला विचारणारा, जेवढे विचारतोय तेवढेच उत्तर दे. लायसन्स दाखव.. कागदपत्र दाखव... नाहीतर त्याचाही दंड भरावा लागेल.’ असा दम देत पोलिसदादा
आपला धाक वाहनधारकांना दाखवित आहेत. साहजिकच हे वाहनधारकही त्यावर नाराजी व्यक्त करीत आहेत.
नियम सर्वांना सारखाच असावा
मी आणि माझा एक मित्र त्याच्या मोटारसायकवरून जात होतो. कुठलीही चूक नसताना पोलिसांनी सर्व कागदपत्रे असूनही नंबरप्लेट तीन अंकी असल्याने शंभर रुपयांचा दंड वसूल केला. आम्ही विचारणा केली, पोलिसांच्या वाहनांचे काय? पण त्यावर बोलता दंड भरण्याचा आग्रहच धरला. आम्हाला घाई असल्याने अखेर दंड भरून आम्ही निघून गेलो. परंतु, नियम सर्वांनाच सारखाच असावा. - अजिंक्य गिते
कायद्यात तरतूदच नाही...
दोन किंवा तीन अंकी नंबर असल्यास सुरुवातीला शून्य टाकावा, असा कुठलाही नियम नाही. त्याची तरतूदही कायद्यात नाही. सुरुवातीच्या शून्याला महत्त्वही नसल्याने त्यावर दंड आकारणे चुकीचेच आहे. जीवनबनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी
विनाकारण सक्ती...
एमएच१५-३१३ या नंबरच्या मोटारसायकलवर महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्याला सर्व कागदपत्रे, परवाना वाहनही नियमातच चालविले जात असताना दंड आकारला. कारण विचारले असता तीन अंकी नंबर असल्याचे सांगण्यात आले. शेजारच्या पोलिस वाहनावरही तीन अंकी नंबर असल्याचे त्याने निदर्शनास आणून दिले. पण, काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीतील पाेलिसांनी अखेर दंड घेतला.
दंडाचे कारणही नाही
वाहतूकपोलिसांनी दिलेल्या १०० रुपयांच्या पावतीवर दंडाचे कारणही नमूद करण्यात आले नाही. केवळ संबंधित वाहनधारकाचे नाव, पत्ता आणि त्याच्या वाहनाचा नंबर त्यावर टाकला आहे. दंडाची रक्कम त्यावर टाकण्यात आली आहे. मात्र, त्याचे कारणच नमूद करण्यात आले नसून पावतीवरील ‘....... याकरिता मिळाले’ या शब्दांच्या आधीचा रकाना रिकामाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा दंड योग्य खात्यात जमा झाला की नाही, याचीदेखील शंका येण्यास यामुळे बराच वाव आहे.
रंगीबेरंगी, नियमबाह्य पद्धतीचे नंबर प्लेटवाले मात्र मोकाटच
एकीकडे तीन अंकी नंबर टाकलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे सोपस्कर पार पाडले जात असताना, नंबर प्लेटच नसलेल्या वाहनांकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जाते. अनेकदा रंगीबेरंगी, दादा, नाना, भाऊंच्या नंबरप्लेट लावणे नियमबाह्य आहे. मात्र, त्यांच्याकडे लक्ष देता केवळ आपले महिना अखेरचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांची जाणीवपूर्वक अडवणूक करत नियमांना तिलांजली देणार्यांना मात्र मोकळेच सोडले जात आहे. त्यामुळे सर्व कागदपत्र सोबत ठेवलेल्या आणि नियमित वाहतुकीच्या नियमांचे पालन करणार्या वाहनधारकांकडून पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
या तीन अंकी नंबरच्या वाहनांचे काय?
तीन अंकी नंबर टाकलेल्या वाहनधारकांकडून दंड वसूल केल्यानंतर संबंधितांनी ‘डी.बी. स्टार’च्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर शहरातील वाहनांच्या पाहणीसाठी गेलेल्या प्रतिनिधींना चक्क पोलिस वाहनांवर तीन अंकी नंबर असल्याचे आढळून आले. त्यामुळे या वाहनांचे काय? त्यांच्यावर कोण कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुळात, तीन अंकी नंबर असल्यास त्यास प्रथम शून्य टाकावा, असा कुठलाही नियमच नाही. मात्र, असे असतानाही दंड वसूल केला जातोय.
थेट प्रश्न : रशांत वायगुंडे, सहायकपोलिस आयुक्त
- तीन अंकी नंबर प्लेट असल्यास कारवाई केली जाते काय?
शक्यतोचार अंकीच नंबर वाहनधारकांनी टाकणे अनिवार्य आहे. असे असले तरीही तीन अंकी नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकावर कारवाई किंवा दंड करणे अपेक्षित नाही.
- पोलिस वाहनांवरचार अंकी नंबर का नाही?
हो,लवकरच नंबर प्लेट चार अंकी करून घेणार आहोत.
- वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांवर दंड आकारला आहे, हे चुकीचे नाही का?
असादंड शक्यतो आकारला जात नाही. कदाचित नंबर प्लेट फँन्सी असेल. परंतु, तरीही मी अशा प्रकारचा दंड करण्याच्या सर्व पोलिसांना सूचना देतो.
- पावतीवर दंडाचे कारण का देत नाही?
दंडकरताना पावतीवर दंडाचे कारण नमूद करण्याच्या सूचना दिल्या जातील.
हे नंबर आले निदर्शनास...
- एमएच१५ एए १८२
- एमएच १५ एए १९८
- एमएच १५ एए १५२