आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नरफाटा परिसरात सहा वाहने जाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड-शिवजयंती व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस व राज्य राखीव दलाचे शहरात सशस्त्र संचलन सुरू असताना, दुसरीकडे समाजकंटकांनी सिन्नरफाटा परिसरात हैदोस घालून सहा वाहनांची जाळपोळ करून शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सिन्नरफाटा परिसरातील नेहे मळा, जुना ओढारोडवर सोमवारी मध्यरात्री दोन ट्रक, रिक्षा, दोन अँपे व मोटारसायकल जाळून पोलिस यंत्रणेला आव्हान दिले.
स्थानिक नागरिकाने याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून माहिती दिल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला असला तरी या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सिन्नरफाटा परिसरात यापूर्वी अशाच प्रकारची घटना घडली आहे. सिन्नरफाटा परिसरात सोमवारी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास गायत्रीनगरात अँपे जाळण्याचा प्रकार घडला. काही वेळानंतर समाजकंटकांनी रिक्षा व मोटारसायकल जाळली, तर काही अंतरावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, सहायक उपायुक्तहेमराज राजपूत व वरिष्ठ निरीक्षक नारायणराव न्याहळदे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन अज्ञात समाजकंटकांचा तपास केला. मात्र, मंगळवारी सायंकाळपर्यंत याबाबत कुठलेही धागेदोरे मिळाले नाहीत.
संशयितांचा शोध युध्दपातळीवर..
वाहने जाळण्याच्या या घटनेनंतर सिन्नरफाटा परिसरात समाजकंटकांचा युद्धपातळीवर शोध सुरू असून, पोलिसांकडून संशयितांची व्यापक पध्दतीने चौकशी करण्यात येत आहे. नारायणराव न्याहळदे, वरिष्ठ निरीक्षक
वाहनांचे नुकसान
समाजकंटकांनी गायत्रीनगर येथील अरिफ सुभान गनी शेख यांची अँपे (एमएच 15, बीजे 1338), हिरालाल फकीरचंद जैन यांची अँपे (एमएच 15, डीके 6109), मधुकर कणसे यांची रिक्षा (एमएच 15, झेड 1560), शैलेश वाघमारे यांची हीरो होंडा (एमएच 15, एसी 880), अशोक नेहे यांची ट्रक (एमएच 15, जी 8852) व ज्ञानेश्वर भिवसन बोरसे यांची ट्रक (एमएच 21, डी 9541) या वाहनांची जाळपोळ केली. यात दोन्ही अँपेची ताडपत्री, स्टेपनी, टायर जळाले. दोन्ही ट्रकच्या ताडपत्र्या जळाल्या, तर रिक्षा व मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले.
पोलिस यंत्रणेला आव्हान देण्याचा प्रयत्न
पोलिस दप्तरी एकाच वाहनाची नोंद
सिन्नरफाटा परिसरात समाजकंटकांनी मध्यरात्रीच्या सुमारास हैदोस घालून सहा वाहनांची जाळपोळ केली असताना पोलिस दप्तरी मात्र मधुकर लक्ष्मण कणसे (42, रा. सावळीरामनगर) यांची रिक्षा जळाल्याची नोंद करण्यात आली. इतर गाड्या जळाल्याचा उल्लेखदेखील करण्यात आला नाही.