आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांचे आयटी उद्योगाचे स्वप्न होणार पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिककरांनी एका तपापूर्वी पाहिलेले आयटी उद्योगाचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. केवळ जागा उपलब्ध नसल्याने कोणताही नवा उद्योग या शहरात गेल्या बारा वर्षांत आला नाही. ‘निमा’कडून 27 जुलै रोजी शहरात होत असलेल्या ‘नाशिक -नेक्स्ट आयटी डेस्टिनेशन’ परिषदेमुळे शहरात आयटी उद्योग येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गोंदे आणि आक्राळे येथील भूसंपादनातील प्रत्येकी 100 एकर जमीन आयटीकरिता राखीव ठेवण्याचे आश्वासन उद्योग सचिव अपूर्व चंद्र यांनी उद्योजकांना दिले आहे. सिन्नर रस्त्यावरील चिंचोली फाट्याजवळील 100 एकर जागा मिळू शकेल, अशी परिस्थिती सध्या असल्याने द्राक्षाचे मळे फुलविणार्‍या नाशिकच्या मातीत आता आयटी उद्योगाचे मळेही लवकरच बहरतील, अशी आशा उद्योगजगतातून वर्तविली जात आहे.

देशातील बंगळुरू, पुणे, हैदराबाद या शहरांतील आर्थिक स्तर आणि जीवनशैली उंचावण्यासाठी तेथे विकसित झालेला आयटी उद्योगच कारणीभूत ठरला आहे. कॉल सेंटर्स, आयटी आणि आयटी संलग्न उद्योग या शहरात बहरले आहेत; पण सद्यस्थितीत मंदीच्या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांना विस्तार करण्यासाठी या शहरांत जागेचा तुटवडा, महागडे मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांकरिताचा वाढीव खर्च यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळेच टायर टू आणि टायर थ्री शहरांकडे या कंपन्या वाटचाल करीत आहेत. गुवाहाटीसारख्या ठिकाणीदेखील कंपन्या जाऊन पोहोचल्या असल्याने नाशिकची संधी वाढली आहे.

अशी होऊ शकेल जागेची उपलब्धता : अंबड औद्योगिक वसाहतीत 65 हजार चौरस फुटांवर साकारण्यात आलेली आयटी पार्कची इमारत पडून आहे. त्याबरोबर सात एकर भूखंडही आयटीसाठी वाटप करण्यात आला आहे. त्याचा वापर आयटी उद्योगांसाठी होऊ शकेल; पण त्यासाठी दरासह नवे धोरण एमआयडीसीला जाहीर करावे लागेल. 0नाशिकरोड-सिन्नर रस्त्यावरील चिंचोली फाट्याजवळील हिरानंदानी समुहाची उपकंपनी जुपूर्णा एंटरप्रायजेस या कंपनीचा 100 एकर भूखंड आयटी पार्ककरिता राखीव आहे, त्याचा उद्देश बदलू नये, अशी मागणी उद्योजकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. 0आक्राळे (ता. दिंडोरी) येथे 315 हेक्टर जमीन एमआयडीसीकडून संपादित केली जात आहे. त्यातील 100 एकर तसेच गोंदे औद्योगिक वसाहतीजवळ संपादित केल्या जात असलेल्या 132 हेक्टरपैकी 100 एकर जमीन आयटीसाठी राखीव ठेवण्याचे आश्वासन उद्योग सचिव अपूर्व चंद्र यांनी दिले आहे. 0क्रेडाईच्या सदस्यांकडून मोठय़ा प्रमाणावर उभारण्यात आलेल्या गृह आणि व्यावसायिक संकुलांतील बांधीव जागाही ते आयटी उद्योगाकरिता देण्यास तयार आहेत.


नाशिक सदासर्वदा उत्तम
पुणे- मुंबईपासून जवळ, नोव्हेंबरपर्यंत सुरू होऊ शकणारे विमानतळ, वर्षाला नऊ हजार अभियांत्रिकी आणि तत्सम उत्तीर्ण होणारे विद्यार्थी, कमी वेतन, वर्षभर उत्तम हवामान आणि महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही शहरांच्या तुलनेत अत्यंत कमी असलेले जमिनीचे भाव यामुळे आयटी उद्योगासाठी नाशिकइतके चांगले शहर देशाच्या पाठीवर सध्या तरी दुसरे नसल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.