आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील सुमारे 500 एकर जागा आरक्षित करून या भागात सुरू असलेली बांधकामे तातडीने बंद पाडण्यात यावी यांसह जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मंगळवारी साधू- महंतांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन केली. यावर मुख्यमंत्री चव्हाण यांनी सिंहस्थ नियोजनासाठी लवकरच नाशकात येऊन बैठक घेणार असल्याचे तसेच केंद्र शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे आश्वासन दिले.
येथील कैलास मठाचे प्रमुख स्वामी संविदानंद सरस्वती, महंत लक्ष्मीचरणदास, महंत भक्तिचरणदास, फलाहारीबाबा, महंत अभयानंद महाराज (घोटी), महंत रामनारायणदास महाराजांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या प्रसंगी स्वामी संविदानंद म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे त्यास विशेष महत्त्व आहे. नाशिकच्या जागांचे भाव गगनाला भिडत असल्याने कुंभमेळ्यासाठी 500 एकरची जागा कायमस्वरूपी आरक्षित करण्यासाठी वेळीच निर्णय घेतला पाहिजे. या जागेच्या भूसंपादनासाठी स्वतंत्र समिती नियुक्त केली पाहिजे. उज्जैन, अलाहाबाद व हरिद्वार येथे एकाच ठिकाणी कुंभमेळा भरत असल्याने जागेचा प्रश्न निर्माण होत नसला तरी नाशिक
व त्र्यंबकेश्वर येथे दोन ठिकाणी कुंभमेळा भरत असल्याने दोन्ही ठिकाणी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शासनाने कुंभमेळा नियोजनासाठी ज्या समित्या स्थापन केल्या आहेत, त्यात एकाही साधू-महंताचा समावेश नसल्याबाबत खंत व्यक्त करण्यात आली. यावर मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले की, सिंहस्थासाठी आपल्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री, महासचिव, जिल्हाधिकारी यांच्या स्वतंत्र चार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
चौपदरीकरणाचा विषय भुजबळांकडे
मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमारेषेला लागून असलेल्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. यामध्ये नाशिक- पेठ रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, तातडीने या मार्गांचे चौपदरीकरण केल्यास दळणवळण वाढून पर्यटनाला वाव मिळू शकतो, असे साधू- महंतांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे काम नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे असून, त्यांनाच या कामाची आठवण करून द्या, असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.