आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकल्प प्रकरणी तीन दिवस कोठडी; मालमत्तेचा पोलिस घेणार शोध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गुंतवणुकीवर दरमहा आठ ते बारा टक्के व्याज व दोन वर्षांत दामदुपटीचे आमिष दाखवून कोट्यवधींना गंडा घातल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघा संशयितांना न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

विकल्प ट्रेड सोल्यूशन्सविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या 20 लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी मुख्य संचालक मयांक ध्रुव, नयन धुव्र यांच्यासह चौघांना अटक केली होती. मुख्य संशयित पोलिस कर्मचारी संजय भालेराव, विजय निकम, संतोष आहेर जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यापासून फरार होते. मंगळवारी ते शरण आले.

गुंतवणूकदारांच्या रकमेतून घेतलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी व आणखी काही साथीदार आहेत का? याचा तपास करण्यासाठी दहा दिवस पोलिस कोठडीची मागणी तपासी पथकाने केली. गुन्ह्याची व्याप्ती पाहता, तसेच संशयितांची मालमत्ता जप्त करणे आवश्यक असल्याने त्यांच्या घरांची झडती, बँक खाती तपासावी लागणार असल्याचा युक्तिवाद सत्र न्यायाधीश काळे यांच्यासमोर करण्यात आला.

फसवणूक झालेल्यांना आवाहन
विकल्पमध्ये फसवणूक झालेल्यांनी तक्रारीसाठी आर्थिक गुन्हा शाखेशी संपर्क साधावा, त्यांचा जबाब नोंदवून पुढील कार्यवाही केली जाईल, असे सहायक आयुक्त पंकज डहाणे व सहायक निरीक्षक एस. एस. जाधव यांनी सांगितले. त्यासाठी पोलिस मुख्यालयातील कार्यालयात प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर (2305230) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.