आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयितांची मालमत्ता जप्त करा, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विकल्प गुंतवणूक प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या संशयितांची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांच्या वतीने महाराष्ट्र ठेवीदार हितसंवर्धन तथा बचाव समितीने केली. समितीच्या पदाधिकार्‍यांसह गुंतवणूकदारांनी मंगळवारी मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

विकल्प सोल्यूशन कंपनीच्या संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली असली तरी कायद्यानुसार संशयितांनी ठेवीदारांच्या पैशांवर जमा केलेली कोट्यवधीची मालमत्ता जप्त करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पोलिस कर्मचारी असलेल्या संजय भालेराव, विजय निकम, संतोष आहेर यांनी स्थापलेल्या विकल्प कंपनीमार्फत शेकडो गरिबांना 20 महिन्यांत पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींना गंडा घालण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी मुख्य संशयित मयांक ध्रुव, नयन ध्रुव यांच्यासह तिघा पोलिस कर्मचर्‍यांसह सहा जणांना अटक केली आहे. ठेवीदार हितसंरक्षण कायद्यानुसार गुंतवणूकदारांचा पैसा मिळविण्यासाठी संशयितांची मालमत्ता जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, र्शीधर देशपांडे व तानाजी जायभावे यांनी केली. ठेवीदार बचाव समितीचे वाल्मीक शिंदे, र्शीकृष्ण शिरोडे, नितीन पवार, दिपक आहिरे, लक्ष्मण निकम, बी. के. जाधव, कल्पेश नानकर आदींसह गुंतवणूकदारांनी हुतात्मा स्मारकापासून मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा समारोप झाला. याप्रसंगी विकल्पच्या लूटारूंची मालमत्ता जप्त करा, अशी घोषणा देण्यात येत होती.