आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vilas Shinde Save Municipal Corporation Money In Nashik

शिंदे महिन्याला वाचविणार महापालिकेचे 45 हजार रुपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. एल.बी.टी. वसुलीतही 40 कोटी रुपयांची तूट असल्याचे आयुक्तांनी जाहीर करून अनेक कामांना कात्री लावण्याचे धोरण अवलंबविले आहे. अशातच पालिका पदाधिकार्‍यांवर होणारा अनाठायी खर्च कमी होण्यासाठी शिवसेनेचे सातपूर प्रभागाचे सभापती विलास शिंदे यांनी त्यांना देण्यात आलेले महापालिकेचे वाहन परत केले आहे. त्यामुळे महिन्याकाठी पालिका प्रशासनाची 45 हजार रुपयांची बचत एकाच पदाधिकार्‍याकडून होणार आहे. तिकडे दिल्लीत आम आदमी पार्टीने (आप) अनेक सरकारी सुविधा नाकारत वेगळा आदर्श समोर ठेवला असताना इकडे शिवसेनेच्या शिंदे यांनी टाकलेल्या पावलावर इतरांनीही पाऊल टाकल्यास एक आदर्श पायवाट निर्माण होऊ शकते.

पालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याने सदस्यांच्या दोन-दोन लाख रुपये खर्चाच्या विकासकामांच्या फाइल पडून राहात आहेत. अशा परिस्थितीत अधिकारी व पदाधिकार्‍यांनी आपल्याला दिलेल्या सोयी-सुविधांना कात्री लावली तर जनतेचा पैसा मोठय़ा प्रमाणात वाचू शकतो. काही कार्यालयांत अधिकार्‍यांना वाहनाद्वारे घरून कार्यालयात आणले जाते. त्यानंतर दुपारी जेवणासाठी व सायंकाळी पुन्हा घरी सोडण्यासाठी या वाहनाचा वापर केला जात आहे. या अधिकार्‍यांनीही सार्वजनिक हिताचे भान ठेवून सार्वजनिक वाहनाचा किंवा स्वत:च्या वाहनाचा वापर केल्यास महिन्याला लाखोंची, तर वर्षाला कोट्यवधी रुपयांची बचत होऊन विकासकामांनाही चालना मिळू शकते. त्यामुळे प्रशासनाने दिलेले वाहन परत केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पालिकेचे वाचू शकतात 45 लाख 60 हजार रुपये
पालिके च्या सहा विभागांतील सभापतींनी असेच पाऊल टाकल्यास महिन्याला दोन लाख 70 हजार रुपये, तर वर्षाला 32 लाख 40 हजार रुपयांची बचत होऊ शकेल. याच धर्तीवर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींनी वाहनभत्त्यासाठी महिन्याला मिळणारे 30 हजार रुपयांचे मानधन परत केल्यास वर्षाला तीन लाख 60 हजार रुपये वाचू शकतात. स्थायी समिती सभापती व विरोधी पक्षनेत्यांनीही वाहनभत्त्यासाठी महिन्याकाठी मिळणारे प्रत्येकी 40 हजार रुपये परत केल्यास वर्षाकाठी नऊ लाख 60 हजार रुपये वाचू शकतात. या सर्वांनी सार्वजनिक हितासाठी हे पाऊल टाकल्यास पालिकेचे 45 लाख 60 हजार रुपये वाचू शकतात.

फाळके स्मारकाला मिळू शकते झळाळी
सार्वजनिक हितासाठी जनतेच्या या नेत्यांनी पुढाकार घेतल्यास वर्षाकाठी सुमारे 45 लाख 60 हजार रुपये वाचू शकतात. या रकमेतून नाशिकचे वैभव असलेल्या फाळके स्मारकाला झळाळी मिळू शकते. सध्या फाळके स्मारकातील खेळणी तुटलेली असून, संगीत कारंजादेखील बंद स्थितीत आहे.

हे ही घेऊ शकतात पुढाकार..
महापालिकेतील पदाधिकार्‍यांपैकी उपमहापौर, सभागृहनेता, विभागीय अधिकारी व सहआयुक्त पालिकेच्या वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहनांचा अथवा स्वत:च्या वाहनांचा वापर करून पालिकेच्या पैशांची बचत करू शकतात.

वाहनाची चावी प्रशासनास परत
स्थायी समितीने मागील वर्षी मंजूर केलेले अंदाजपत्रक दोन हजार कोटींवरून एक हजार कोटींवर आले आहे. पालिकेची बिकट परिस्थिती पाहून प्रशासनाने दिलेले वाहन शुक्रवारी विलास शिंदे यांनी परत केले.