आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vilas Shinde Save Municipal Corporation Money In Nashik

मेवा नको, फक्त सेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनतेचा आवाज बुलंद होतोय. सार्‍या जगात बदलाचे वारे वाहताय. जनतेवर रुबाब गाजविणार्‍या सत्ता धुळीस मिळत आहेत. आपल्या देशातही दोन वर्षांपासून हे घडत आहे. म्हणूनच दिल्लीच्या तख्तावर शनिवारी ‘आम आदमी’ मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाला. आता नेतेगिरी करून मोठे होता येणार नाही. केवळ सत्तेचा मेवा खाऊन निभावणार नाही. सामान्य माणसाला सेवा हवीय. त्याचा आवाज हवाय. आपल्या शहरातही हा आवाज येत्या काळात घुमेल. अनेकांचे धाबे दणाणेल. कारण पालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. कर्जाच्या खाईत पडलेली महापालिका जर्जर होऊ पाहत आहे. विकासकामांच्या फायली पडून आहेत. अशात लोकोपयोगी कामे झाली नाहीत, तर जनता आता स्वस्थ बसणार नाही. याचा वेळीच धडा घ्यायला हवा. दिल्लीत जे स्वप्न साकारत आहे, ते आपल्या नाशकातही 39 वर्षांपूर्वी साकारले होते. 1974 ते 80 या काळात भगूर नगरपालिकेतील नगराध्यक्ष पां. भा. करंजकर तसेच जगन्नाथ धात्रक, चंदर दिवटे, कोंड्याबाई जमदाडे, रंजना ओहोळ, आर. डी. साळवे, शंकरराव शेटे आदी 15 नगरसेवकांनी एक अभिनव उपक्रम राबविला होता. या सर्व पदाधिकार्‍यांनी तेव्हा तब्बल सहा वर्षे मानधन घेतले नव्हते.

पालिकेची डबघाईस आलेली स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी मीटिंग व प्रवास भत्ता, कुठल्याही सुविधा पालिकेकडून घेतल्या नव्हत्या. त्यातून वाचलेल्या पैशांतून त्या काळी पथदिवे, भूमिगत गटारी, उद्याने, पाण्याची टाकी, आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. आता सातपूर प्रभागाचे सभापती विलास शिंदे यांनी शुक्रवारी प्रशासनाचे वाहन नाकारत महिन्याला पालिकेचे 45 हजार वाचविण्याच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले आहे. नव्या बदलाची ही नांदी आहे. आता मागे राहिलात तर संपलात. त्यामुळे या सामाजिक बदलात सहभागी होण्यासाठी पुढे या. पालिकेचे सहा प्रभाग सभापती, महिला व बालकल्याणच्या सभापती, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, उपमहापौर, सभागृहनेता, विभागीय अधिकारी व सहआयुक्त हेही शिंदे यांच्याप्रमाणे प्रशासनाचे वाहन नाकारू शकतील. या अभियानाचा भाग बनून तेही जनतेचा पैसा वाचवून विकासकामांना गती देऊ शकतील. असे झाल्यास जनतेच्या पैशांची उधळपट्टी तर थांबेलच; पण विकासकामे होऊन शहराचा चेहराही बदलेल. नाशिक देशात आदर्श ठरेल. त्यासाठी कुणी नेता येऊन घोषणाबाजी करण्याची गरज नाही. चला, पहिले पाऊल आपणच टाकूया. या बदलाचे भागीदार होऊया. नव्या जगाच्या हाकेला साद देऊया.

जयप्रकाश पवार (निवासी संपादक)