आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर मुख्यमंत्र्यांसह समितीच्या सदस्यांचे फोटो पायदळी तुडवू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणुकीपूर्वीच मराठा समाजाला आरक्षण द्यावे. र्शेयवादाचा कुठलाही मुद्दा त्यात येणार नाही. आम्ही स्वत:च राणे समितीच्या सदस्यांसह मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू. परंतु, तसे न झाल्यास मात्र गावोगावी त्यांचे फोटो पायदळी तुडवत त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी नाशिक येथे दिला. काँग्रेस आघाडीतील आमदारानेच थेट सत्ताधार्‍यांना लक्ष्य केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटण्याचे चित्र आहे.

मराठा समाजातही मोठय़ा प्रमाणावर आर्थिक दुर्बल घटकांची संख्या असून, त्यांच्याच हितासाठी आरक्षणाची मागणी केली जात असताना त्याकडे कित्येक वर्षांपासून राज्य शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. शिवसंग्राम पक्षाचा आग्रह आणि पाठपुराव्यामुळेच शासनाने आरक्षणासाठी राणे समितीची नेमणूक केल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले. समितीने अहवाल देण्याची मुदत डिसेंबरला संपत असून, आता पुन्हा मुदतवाढ देऊ नये. सर्वेक्षणासह आरक्षणासंदर्भातील अहवाल मुदतीतच शासनास सादर करण्याची मागणी मेटे यांनी करत आताच आरक्षण लागू करण्याचा आग्रह धरला. सर्वेक्षण अहवाल शासनाने जमा न केल्यास शिवसंग्राम पक्षच तो गावोगावी जाऊन एकत्र करत वाजतगाजत शासन दरबारी जमा करेल, असेही मेटेंनी स्पष्ट केले. आम्हाला कुणाच्या आरक्षणात वाटा नको. स्वतंत्र आरक्षण द्या. सध्याच्या ओबीसींना त्यांच्या आरक्षणाच्या टक्केवारीसह ‘अ’ गटात अन् आम्हाला ‘ब’ गटात बसवत सध्याच्या 52 टक्क्यांव्यतिरिक्त 25 टक्के आरक्षण द्यावे, अशीच मागणी आहे. परंतु, ओबीसींचे नेते समाजात गैरसमज पसरवत असल्याची टीका करत हे नेते कोण आहेत, त्यांचा नामोल्लेख टाळत ते नाशिककरांना माहीत असल्याचे ते म्हणाले. शिवाय, आरक्षणाच्या इतर पर्यायांची माहिती देत राज्य शासनाने निवडलेला पर्यायच उत्तम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आर्थिक निकषावर आरक्षणाची घटनेतच तरतूद नाही : आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची घटनेतच तरतूद नाही. तसे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने एका सुनावणीत दिले आहेत. त्यामुळे जे नेते आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचे मत मांडत आहेत, त्यांना अर्धवट माहिती असून, ते चुकीचेच असल्याचे त्यांनी सांगत नाव न घेता एकप्रकारे आपल्याच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाच शाब्दिक टोला हाणला.