आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्रामगडावरील ‘जीवन’ तीनशे वर्षांनंतरही अनमोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - सिन्नर तालुका पाणीटंचाईचा सामना करत असताना पट्टेवाडीच्या 500 लोकवस्तीला आजही शिवकालीन पाणी व्यवस्थापनेचा आधार मिळत आहे.

सिन्नर - अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरील विश्रामगडावर पाण्याने भरलेले 22 तळे शिवाराची तहान भागवत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाणी व्यवस्थापनेचा आदर्श तीनशे वर्षांनंतरही मार्गदर्शक ठरत आहे.

गडावर असलेल्या 47 तलावांत कमी-जास्त प्रमाणात आजही पावसाचे पाणी साठून राहते. परिसरातील तिरडे, पेढेवाडी, ठाणगाव, औंढेवाडी या भागातील पाण्याचे साठे उन्हाळ्यात कोरडे पडल्यास वन्यप्राण्यांना किल्ल्यावरील पाण्याचाच एकमेव आधार असतो. एकीकडे पुरातन बारव, विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत, तर धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. तथापि, टंचाईच्या भीषण परिस्थितीत 300 वर्षांनंतरही शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेले तळे तारक ठरले आहेत.

भूमिगत तळ्याचे वैशिष्ट्य
भूमिगत तळ्याची निर्मिती खडकात कोरीव पद्धतीने करण्यात आल्याने त्यात पावसाचे पाणी थेट पडत नाही. जमिनीवरून पाणी झिरपून तळ्यात साठले जाईल, अशी व्यवस्था आहे. पाणी झिरपून साठून राहण्याची क्रिया उन्हाळ्यातही अल्प प्रमाणात सुरू राहत असल्याने पाणीसाठा टिकून राहण्यास मदत होते. गारवा टिकून राहिल्याने थंडगार, स्वच्छ पाणी पिण्यास मिळते. पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. पाण्याचा थेंबन् थेंब पिण्यासाठी वापरात येईल, अशी व्यवस्था आहे.

कोरीव तळ्यातील पाणी वापर
किल्ल्यावरील पट्टाईदेवीच्या मंदिरालगत दोन तळे आहेत. यातील खडकात कोरलेल्या 50 फूट लांब, 70 फूट रूंद व 10 फूट खोलीच्या तळ्यातून पट्टेवाडीतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली विहीर मार्चच्या सुरुवातीलाच आटली आहे. त्यामुळे तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. तळ्याला लहान जलवाहिनी जोडल्याने 400 फूट उंचीवरील पाणी किल्ल्याच्या निम्म्या भागापर्यंत आणणे शक्य झाले आहे. किल्ल्यावरील गुहेजवळ काढलेल्या नळाच्या तोटीद्वारे पट्टेवाडीतील आदिवासी पाणी वाहून नेतात.

10 लाख लिटरहून अधिक क्षमता
गिरीदुर्ग प्रकारच्या या किल्ल्यावर भूमिगत प्रकारचे तीन तळे आहेत. एका तळ्यात किमान 10 लाख लिटर पाणी मावेल, अशी व्यवस्था आहे. टंचाईच्या स्थितीत जवळच्या एका तळ्यातून पाण्याची सुविधा झाल्याने पट्टेवाडीला पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही.