आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखकाने एकाच विषयाच्या प्रेमात जीवन वाया घालवू नये : पाटील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकाच विषयाच्या प्रेमात पडणं वा त्यात जीवन वाया घालवणं हे बरं नसतं. दहा दरवाजे आेलांडल्याशिवाय आणि छपन्न माड्या चढल्याशिवाय जीवनाची खरी अनुभूती येतच नाही, असे सांगतानाच हजाराे ग्रंथ वाचून जे ज्ञान मिळत नाही ते जगभराच्या भटकंतीतून मिळत असल्याचा माैलिक अनुभवदेखील जगविख्यात मराठी साहित्यिक विश्वास पाटील यांनी सांगितला. ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर प्रशांत दीक्षित यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने घेतलेल्या मुलाखतीला विश्वास पाटील यांनीदेखील तितक्याच दिलखुलासपणे उत्तरे दिली. कुसुमाग्रज स्मारकात ‘दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल’च्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘साहित्याचे स्वतंत्र विचार’ या विषयावरील विश्वास पाटील यांची मुलाखत रंगली. बालपणीच्या गरिबीच्या विषयातील काेशात न अडकता त्यांनी जीवनाकडे वेगवेगळ्या पद्धतीनं बघितले, त्यामुळेच साहित्य समृद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. सव्वा तास रंगलेल्या मुलाखतीमधील हा काही रंजक भाग.
अभिव्यक्तीचं माध्यम असलेलं पेन आणि कागद हाच माझा स्वभाव आहे हे तुम्हाला काेणत्या वयात जाणवलं? थाेडक्यात तुमच्यातील व्यक्तिमत्त्व तुम्हाला कधी गवसलं?
विश्वास पाटील : चाैथ्या-पाचव्या इयत्तेत असताना आमच्या गावाच्या बाजूला नदीच्या पलीकडच्या बाजूला अण्णा भाऊ साठे हे महान दलित लेखक राहत होते. त्यांची सामाजिक विचाराच्या अंगानं जाणारी आणि माय मराठीचं उत्तम लेणं ठरावं अशी फकिरा नावाची कादंबरी मी त्या वयात पाठ केलेली होती. त्यांची लुसलुशीत भाषा, धारदार, टाेकदार वेगळ्या शैलीनं मला वेड लावलेलं होतं. र. वा. दिघे या एका महान लेखकाची सराई आणि पानकळ्या या कादंबऱ्या वाचताना माझं मन थरारून गेलं. त्यानंतर आतून वाटायला लागलं की, आपण काहीतरी लिहायला पाहिजे. त्या दृष्टिकाेनातून लेखनाकडे वळलाे. दहाव्या इयत्तेत असताना पुण्याच्या तरुण भारत दैनिकाने कथा स्पर्धा घेतली होती. त्यात माहेर तुटलेल्या एका मुलीची ‘कायदा’ नावाची कहाणी मी प्रथम लिहिली. तिथेच मला लिखाणाची वाट सापडली.

प्रशासकीय सेवेत राहून जी जनमानसाची, राजकारणाची वेगवेगळी रूपे बघायला मिळाली. त्यातून एखादी राजकीय कादंबरी मनात आहे का? तसा काही विचार आहे का, की निवृत्तीनंतरचा तो विचार आहे ?
विश्वास पाटील :
नाही, असा विचार करून मी कधीच लिहिले नाही. अन्यथा, झाडाझडती किंवा लस्ट फाॅर लालबाग लिहिलीच नसती. लस्ट फाॅर लालबागसारख्या पुस्तकातून त्या स्वरूपाचे काही लिखाण झाले आहे. मुंबईत जिल्हाधिकारी असताना अनेक गँगस्टर आणि एन्काऊंटरफेम पाेलिसांशीही संबंध आला होता. माझे एक काका गिरणी कामगार असल्याने परळमध्ये राहायचाे. गिरणीतील पाळीप्रमाणे झाेपायचीही पाळी असायची. संडासचीदेखील रांग. त्यामुळे पुढे जीवनात कळा कशा साेसायच्या ते मला तिथूनच शिकायला मिळाले.
विश्वास पाटील उवाच
- रणांगण नाटकाचे पहिले वाचन हे नाशकात कुसुमाग्रजांच्या घरी आणि कानेटकरांच्या उपस्थितीत झाले होते.
- अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीने माझ्या बालमनावर साहित्याचे संस्कार केले
- गरिबीमुळे माझ्या काॅलेजची फी अनेकदा निळू फुले भरत होते.
- खेड्यापाड्यातील अनुभव आणि भटकंतीतूनच पुढे येतात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा
- पिंजऱ्यातील श्रीधर मास्तर सापडतो तो जर्मनच्या पहिल्या मूकपटात
- राजहंस आणि मी एकत्र आल्याशिवाय विचारांच्या ठिणग्या उडत नाही.
- लेखकाने टीपकागदासारखे असायला हवे. आसपासचा प्रत्येक माणूस नजरेने टिपता आला पाहिजे.
- माझ्या पाेतडीतल्या गाेळ्या संपल्या नाहीत. त्यामुळे भैरप्पांसारखे आत्मचरित्र लिहिण्याचा सध्या तरी तसा विचार नाही.

जाहीर आव्हान- लस्ट फाॅर लालबागवर आराेप झाले. माझ्या त्या कादंबरीतील चार डायलाॅगदेखील जर मी कुठून उचलले असतील तर मी लेखणी उचलणार नाही ? हे मी आव्हान दिलेले आहे. वाचकांनी शेकडाे पत्रे पाठवूनही ती छापली गेली नाहीत. वाङमय चाैर्याचा आराेप होताना दाेन्ही बाजू संबंधित वृत्तपत्राने छापायला हव्या होत्या. पण तसे झाले नाही. वारा खात, गारा खात बाभूळ झाड उभे आहे. कारण ते टणक आहे.

सविस्तर मुलाखत लवकरच अंकात प्रसिद्ध केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...