आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठल माझी माय, आम्हां सुखा उणें काय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीत सुमारे आठ ते दहा लाख वैष्णवांचा वारकरी मेळा जमला आहे. पुंडलिक मंदिर, नामदेव पायरी, मंदिर मार्ग आणि प्रदक्षिणा मार्गावर वारकऱ्यांची प्रचंड गर्दी होती. प्रत्येक भाविकाच्या मुखी फक्त .. विठ्ठल... विठ्ठल, माउली आणि तुकोबारायांचा गजर सुरू होता. पवित्र चंद्रभागा नदीत स्नान, पुंडलिक मंदिरात दर्शन, नामदेव पायरी आणि कळस दर्शन घेताना वारकरी भावूक होताना दिसला. २२ दिवसांचा पायी प्रवास करून विठ्ठल भेटीला आलेले वारकरी विठ्ठल दर्शनाने तृप्त झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होती. "पंढरीचा वारकरी...वारी चुको दे हरी’ ही मागणी देवाकडे ते करत होते.
तुकोबापालखींची नगरप्रदक्षिणा :
श्रीसंत तुकोबांची पालखी सकाळी तुकोबा मंदिरातून बाहेर आली. माउली, तुकोबाच्या गजरात पालखीची नगरप्रदक्षिणा झाली. त्यांच्या पादुका दर्शनासाठी मंदिरात नेण्यात आले. या वेळी पालखी सोहळाप्रमुख अभिजित मोरे महाराज यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते.

पोलिसांचे नेटके नियोजन
यंदावाहतूक कोंडीची समस्या जाणवली नाही. कराड नाका, बार्शी नाका, बायपास रस्त्यावर दोरी बांधून नियोजन करण्यात आले होते. पुंडलिक मंदिर, नामदेव पायरी, सिद्धिविनायक मंदिराजवळ तसेच चौकाच्या ठिकाणी एका बाजूने दोरी बांधण्यात आली होती. त्यामुळे चौकातील गर्दी, धक्काबुक्कीचे प्रमाण कमी होते. जागोजागी माईकवरून सूचना देण्यात येत होती. कुणी हरवले, कुणी सापडले तर त्यांची नावे पुकारण्यात येत होती. यामुळे नातेवाइकांना शोध घेण्यास मदत मिळत. किरकोळ अपवाद वगळता नेटके नियोजन होते. धुळीचे प्रमाण जास्त होते.

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या विविध भागातून सुमारे आठ ते दहा लाख वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात हजेरी लावली. दर्शनाआधी भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.