आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणीसाठी प्रशासनाची विशेष खबरदारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 16 मे रोजी होणार असून, त्यासाठीचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरिता 15 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. 14 टेबलवर प्रत्यक्षात मोजणी होईल, तर एक टेबल मतमोजणी सूक्ष्म निरीक्षकांसाठी राहणार आहे.

नेमण्यात आलेल्या कर्मचारी व अधिकार्‍यांना आपली नेमणूक कुठल्या टेबलवर आहे, याची माहिती त्याच दिवशी सकाळी 6 वाजता समजणार असल्याने यंदा आयोगाने मतमोजणीसाठीही विशेष खबरदारी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मतमोजणीसाठी आयोगातर्फे नेमण्यात आलेल्या निरीक्षकांव्यतिरिक्त कुणालाही मोजणी कक्षात मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी राहणार नाही. प्रत्येक टेबलवर एक राजपत्रित दर्जाचा अधिकारी पर्यवेक्षक, समादेशक आणि सूक्ष्म निरीक्षक आणि एक कर्मचारी अशा चार जणांची नियुक्ती असेल. शिवाय आयोगाचे प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी दोन सूक्ष्म निरीक्षक राहाणार आहेत.

राजपत्रित अधिकार्‍यांमध्ये कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकार्‍यांची नेमणूक करू नये, असे स्पष्ट आदेश आयोगाने दिल्याने आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका, नगरपालिकांचे अधिकारी मतमोजणीस नसतील. त्यामुळे प्रशासनासमोरील अधिकारी नेमण्यासाठी अडचणी वाढल्या आहेत. प्रत्येक टेबलवर राजकीय पक्षांना-उमेदवारांना त्यांच्या एका प्रतिनिधीची नेमणूक करता येणार असल्याचे दिंडोरी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितले.

दोन सत्रांत प्रशिक्षण
मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचारी व अधिकार्‍यांचे 9 आणि 15 मे रोजी दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण होणार आहे. शिवाय मतमोजणीच्या 24 तास अगोदर त्यांचे आयोगाच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत रॅन्डमायझेशन होणार आहे.
नियोजन