आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार नोंदणीसाठी सरसावले भावी अभियंते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एक मत देशाच्या व पर्यायाने स्वत:च्या विकास किंवा अधोगतीला कारणीभूत कसे ठरते, याबाबत माहितीपटाद्वारे सादरीकरण करीत 18 वर्षांवरील तरुणांनी त्वरित मतदार नोंदणी करावी, असे आवाहन मविप्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील भावी अभियंत्यांना मंगळवारी करण्यात आले. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे ‘वोट फॉर बेटर इंडिया’ आणि ‘दिव्य मराठी’चे ‘बना मतदार’ या अभियानाला यावेळी उत्तम प्रतिसाद लाभला. पाचशेवर तरुणांना अर्जांचे वितरण करण्यात आले.

सकाळी नऊला प्रत्यक्ष अभियानाला सुरुवात झाली. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रतिनिधी राहुल पाटील यांनी विद्यार्थी सभेच्या सदस्यांना अभियानाची माहिती दिली. प्रत्येक वर्गप्रतिनिधीस जबाबदारी समजावून सांगितली. त्यानंतर त्यांनीच वर्गातील इतर विद्यार्थ्यांना नाव नोंदविण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार यांनीही वर्गावर्गांत, कॅम्पसमध्ये फिरत विद्यार्थ्यांना नाव नोंदवण्याचे आवाहन केले. महाविद्यालयातच नोंदणीचे अर्ज उपलब्ध असून, ते त्वरित भरण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

भारतीय लोकशाही आणि कार्यपद्धती विद्यार्थ्यांना माहितीपटाद्वारे समजावून सांगत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या सभासदांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. राहुल पाटील, स्नेहल रायते, हर्षल शेलार, अनीश मसराणी, अतुल भट यांनी मविप्र महाविद्यालयात, तर पंकज जाधव, योगेश अमृतकर, सागर पाटील, हर्षल शेलार यांनी बीवायके महाविद्यालयात अर्ज वितरण आणि स्वीकृती केली.

साडेतीनशेवर अर्ज जमा : सोमवारी बीवायके आणि गोखले अभियांत्रिकीत वितरित केलेल्या अर्जांपैकी ‘बीवायके’त 150 आणि अभियांत्रिकीत दोन दिवसांत दोनशेवर अर्ज विद्यार्थ्यांनी भरून दिले.

ही कागदपत्रे आवश्यक : रहिवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचे तीन फोटो, वीजबिल, पॅनकार्ड, आधारकार्ड आदी. अधिक माहिती www.ceo.maharastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विद्यार्थी प्रतिनिधींकडून स्वागत
शहरात 44 टक्के तरुणांनी त्याची नोंदणी केलेली आहे. ग्रामीण भागात मात्र हेच प्रमाण 66 टक्के आहे. शहरवासीयांनी याचा विचार करावा. विधी ठक्कर,विद्यार्थी प्रतिनिधी

महाविद्यालयातील मतदार नोंदणी हा चांगला पर्याय असल्याचे विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून सर्वांना सांगत आहे. चांगल्या भविष्यासाठी नावनोंदणीच्या माध्यमातून आजच गुंतवणूक करण्याचा सल्लाही देत आहे. - सानिका टिळे

मतदान केंद्रात जाऊन नाव नोंदवण्याचा आणि महाविद्यालयातील नावनोंदणीतील फरक समजावून सांगत प्रत्येक विद्यार्थ्याला त्वरित अर्ज घेण्याचे आवाहन करीत आहे. मंदार ठाकूर , सांस्कृतिक प्रतिनिधी

या अभियानामुळे महाविद्यालयात मतदार नाव नोंदणीची चांगली संधी उपलब्ध असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगत आहे. किरण सोनवणे, विद्यार्थिनी प्रतिनिधी

उपक्रमाचे स्वागत
‘दिव्य मराठी’ च्या ‘बना मतदार’ अभियानाचे स्वागत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची मनुष्यबळासह आवश्यक ती मदत दिली जाईल. विलास पाटील, जिल्हाधिकारी

मतदानाचा हक्क
20 पैकी सात विद्यार्थी प्रतिनिधींनी मतदारयादीत नाव नोंदवले. अडीच हजारपैकी बहुतांश विद्यार्थ्यांची नोंदणी बाकी आहे. त्यासाठी हे अभियान आहे. अँड. विशाल चव्हाण, आर्ट ऑफ लिव्हिंग