आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार नोंदणीची मुदत उद्यापर्यंतच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अद्यापही ज्यांनी मतदार यादीत नाव नोंदविले नाही, अशांना बुधवार(दि. १७)पर्यंत आपले नाव नोंदविण्याची अंतिम संधी आहे. त्यानंतर नोंदणी केलेल्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात येणार नसल्याने १७ सप्टेंबरपूर्वीच आपल्या नावाची खात्री करण्यासह नावनोंदणी करत एेनवेळी होणारी धावपळ मतदारांनी टाळावी.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक अधिसूचना १९ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे, तर २७ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या दहा दिवस आधी म्हणजे १७ सप्टेंबरपर्यंत नाव नोंदविता येते. त्यामुळे अद्यापही ज्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली नसेल, अशांना बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले अर्ज योग्य कागदपत्रांसह आपापल्या मतदान केंद्रातच सादर करता येतील.

ऑनलाइनही करता येणार नावनोंदणी
निवडणूक आयोगाच्या www.eci.nic.in या संकेतस्थळावरील महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या लिंकवर गेल्यास तेथेही मतदार नानोंदणी करता येईल. तेथील नावनोंदणीच्या पर्यायावर नोंदणी करता येईल. हा भरलेला अर्ज स्थानिक मतदान केंद्रात जमा करावा लागेल. मतदार नोंदणीसाठी आयोगाकडून ही सोय संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही कागदपत्रे आवश्यक
> कुठलाही एक रहिवासी पुरावा (रेशनकार्ड, वीजबिल, फोन बिल)
> फोटो ओळखपत्र (लायसन्स, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक फोटो असलेले)
> जन्माचा पुरावा - त्यात शाळा सोडल्याचा दाखला, दहावीचे जन्मतारीख असलेले प्रमाणपत्र यापैकी एक पुरावा द्यावा.

येथे करा नोंदणी
आपल्या घराजवळील व ज्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान केंद्र होते, तेथे बूथस्तरीय मतदान अधिकाऱ्यांकडेच मतदार नावनोंदणी करता येणार असल्याने या ठिकाणी जाऊन आपले नाव नोंदवावे.

लवकर नाव नोंदवावे
मतदार नोंदणीची अंतिम मुदत बुधवारी (दि. १७) सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून, ज्या मतदारांना नाव नोंदणी करायची आहे त्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आपले नाव या मुदतीच्या आत लवकरात लवकर नोंदवावे. यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टळेल. गीतांजली बाविस्कर, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा