नाशिक- ‘मतदारयादी पुनरीक्षण मोहीम बुधवार (दि. 11)पासून सुरू होणार आहे. त्यासाठी शाळेतील एक खोली रिकामी करण्यात आलेली असून, या मोहिमेसाठी दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. बुधवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत अर्ज मिळतील आणि मतदारयाद्याही पाहावयास मिळतील.हे वाक्य आहे बी. डी. भालेकर हायस्कूलमधील एका शिपायाचे. त्यावर आमच्या प्रतिनिधीने ही मोहीम ही 9 तारखेलाच सुरू झाल्याचे सांगताच ती माहिती शाळेचे शेलार सर देतील, असे त्याने सुनावले. शेलार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन विचारणा केली असता मोहीम 9 तारखेलाच सुरू झाली; परंतु आमचे शिक्षक लग्नाला गेलेले असल्यामुळे बुधवारपासून मोहीम सुरू होईल. तथापि, तुम्हाला आजच अर्ज हवा असेल, तर तेथील शिपायाला भेटा, तो तुम्हाला अर्ज देईल. त्याची झेरॉक्स काढा व उद्या अर्ज दाखल करा, असा सल्लादेखील शेलार यांनी दिला अन् मोहीम बारगळल्याचे अधोरेखित झाले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये दि. 9 जूनपासून प्रत्येक मतदार केंद्रावर मतदार पुनरीक्षण मोहीम सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. लोकसभा निवडणूक प्रक्रियेत मतदारांची नावे गहाळ झाल्याचा गलथान प्रकार झाला होता. या प्रकारावर नागरिकांकडून ओरड झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून पुन्हा मतदार पुनरीक्षण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. हे काम किती गांभीर्याने सुरू आहे त्याचा आढावा घेण्यासाठी प्रतिनिधीने शहरात फेरफटका मारला असता ही मोहीम बारगळली असल्याची प्रचीती आली. अर्ज घेणार्या मतदारांची हेळसांड झाल्याच्या तक्रारीही त्याद्वारे प्राप्त झाल्या आहेत. अशीच परिस्थिती शहरातील इतरही मतदान केंद्रांची असल्याचे दिसून येत आहे. शाळांना सध्या सुटी असल्यामुळे हे केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ कधी उपलब्ध होणार, याकडे संबंधित मतदारांचे लक्ष लागून आहे.