आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोंदणीस फिरकेना मतदारराजा; दुसर्‍या दिवशीही मतदारांकडून अल्प प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष नोंदणी मोहिमेस रविवारी दुसर्‍या दिवशीही मतदारांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. शहरातील अनेक केंद्रांवर मतदारराजा फिरकलाच नाही. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम सुरू केली आहे.
शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर या विशेष मोहिमेंतर्गत मतदार नावनोंदणीची सुविधा निवडणूक विभागाने उपलब्ध करून दिली होती. बहुतांश सर्व शाळांमध्येच ही सुविधा होती. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या प्रत्येक केंद्रावर मतदार नोंदणी अधिकारी अर्जांसह अक्षरश: बसून होते. मतदारांची जणू ते वाटच पाहत बसले होते. मात्र, मतदारराजा तिकडे फिरकण्याचे जणू नावच घेत नसल्याचे चित्र शहरातील या सर्वच केंद्रांवर दिसत होते. काही केंद्रांवर मात्र थोड्याबहुत प्रमाणात अधूनमधून नागरिक येत होते आणि मतदार नोंदणीचा, नाव-पत्ता बदलाचा अर्जही भरून देत होते. पण, हे प्रमाण अगदीच अल्प होते.
फलक नसल्याने गोंधळ
मतदार नोंदणी केंद्रावर नवीन नाव नोंदणीसाठी कुठली कागदपत्रे हवीत, पत्ता बदलण्यासाठी, नावात बदल करण्यासाठी नेमकी कुठली कागदपत्रे हवीत, याचीच विचारणा अनेक मतदार संबंधित कर्मचारी व अधिकार्‍यांना करत होते. त्यामुळे वैतागलेले अधिकारी अनेकदा त्यांना योग्य उत्तरेही देत नसल्याने काही प्रमाणात शाब्दिक चकमक होत होती. त्यामुळे हा वाद निर्माण होऊ नये, यासाठी मतदान नोंदणी केंद्रांवर संपूर्ण माहिती देणारा फलक लावण्याची मागणी काही मतदारांनी केली.
कामटवाडे व श्रमिकनगरातील केंद्रात अर्जच अनुपलब्ध
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी यांनी नाव नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या अर्जांची कुठेही कमतरता नाही. प्रत्येक विधानसभेसाठी शहरात पाच हजार आणि ग्रामीण भागात दोन हजार अर्ज तसेच जिल्ह्यास एक लाख अर्ज उपलब्ध झाल्याचे सांगितले होते. मात्र, सिडको येथील कामटवाडे भागातील मीनाताई ठाकरे शाळेत, तसेच श्रमिकनगर येथील हिंदी माध्यमिक शाळेत सकाळी 12 वाजेपर्यंत अर्जच उपलब्ध नव्हते. त्यामुळे मतदारांची चांगली गोची झाली. अनेकांना रिकाम्या हातानेच नाव न नोंदविताच परतावे लागले.
कागदपत्रांची माहिती मिळावी
४प्रशासनाची मोहीम चांगली आहे; पण नोंदणीसाठी कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत, त्याचे फलक तेथे नाहीत. त्यामुळे प्रत्येक वेळी मतदारांना संबंधित अधिकार्‍यांनाच विचारावे लागत होते. उत्तरही नीट मिळत नाही. त्यामुळे फलक लावणे गरजेचे आहे.
- डॉ. विनायक गोविलकर
नाव मतदार यादीत येणार
४अनेकदा नाव नोंदणीचा प्रयत्न केला. आवश्यक कागदपत्रे नव्हती, त्यामुळे ते नोंदविलेच गेले नाही. आता मात्र स्वत:हून कागदपत्रांची जमवाजमव केली आहे. माझे नाव मतदार यादीत येणार असून, मी प्रथमच मतदान करणार याचा मला खूप आनंद आहे.
- पूर्वा विसपुते, मतदार
विशेष मोहीम शनिवारी-रविवारी संपली असली तरीही छायाचित्र मतदार याद्यांची पुनरीक्षण मोहीम सुरू आहे. 30 जूनपर्यंत मतदारांना यात नाव नोंदविता येईल. त्यामुळे अद्याप ज्यांनी नाव नोंदविले नाही अशा मतदारांनी आपल्या घराजवळील मतदान केंद्रावर नाव नोंदणीसाठी जावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नाशिकरोडला प्रतिसाद
मतदार नावनोंदणी मोहिमेस नाशिकरोडवासीयांनी रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाशिकरोड शहर परिसरातील सर्व शाळांमध्ये नावनोंदणीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. महापालिका शाळांमधील शिक्षकांकडे नाव नोंदणीचे काम सोपविण्यात आले आहे. 30 जूनपर्यंत परिसरातील शाळांमध्ये नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. अनेक तरुण-तरुणींकडून नावनोंदणीला प्रतिसाद मिळाला, तर अनेक जणांनी पत्ता बदलण्यासाठी अर्ज केला.

शहरातील मुक्तिधाम, आठवडे बाजार, तेलीगल्ली, गोसावीवाडी, पाण्याची टाकी, उपनगर, चेहडी, विहितगाव, दसक, पंचक या भागातील शाळांमध्ये नाव नोंदणी सुरू होती. या ठिकाणी मतदारांनी नोंदणीसाठी गर्दी केली.