आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान केंद्र बदलातून गोंधळ; सेनेचा आक्षेप, नव्या मतदान केंद्रामुळे मतदार पडणार गोंधळात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मतदानाच्या पूर्वसंध्येला संवेदनशील मतदान केंद्र व मतदान यंत्रांची पाहणी करताना निवडणूक अायुक्त दीपक कपूर, महापालिका अायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिषेक कृष्णा. - Divya Marathi
मतदानाच्या पूर्वसंध्येला संवेदनशील मतदान केंद्र व मतदान यंत्रांची पाहणी करताना निवडणूक अायुक्त दीपक कपूर, महापालिका अायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिषेक कृष्णा.
नाशिकरोड - नाशिकरोड परिसरातील प्रभाग २० आणि २१ मधील मतदार केंद्र आणि खोल्या यांच्यात करण्यात आलेला बदल आणि पूर्वीच्या नियोजनानुसार स्लिपांचे झालेले वाटप यामुळे मतदारांची मोठी दिशाभूल होणार असल्याने उमेवदारांमध्ये तीव्र संताप आहे.
 
यासंदर्भात नाशिकरोड येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात शिवसैनिकांनी जाब विचारला असता अधिकाऱ्यांना ठोस उत्तर देता आले नाही. याबाबत महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय आधिकारी अभिषेक कृष्णा यांनी रात्री उशिरा भेट देत स्थानिक अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
 
नाशिकरोड येथील प्रभाग २० मध्ये ८ ते ३३ या खोल्या तर, प्रभाग २१ मध्ये २० ते २९ या खोल्यांमध्ये अचानक अदलाबदल करण्यात आला. याबाबत उमेदवारांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तोपर्यंत काही उमेदवारांनी मतदार स्लिपचे वाटप केले गेले होते. मात्र, ही बाब माहीत झाल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी थेट विभागीय कार्यालय गाठून जाब विचारला. मात्र महापालिकेचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. 

त्यामुळे शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत रुद्रावतार धारण केला होता. संतापलेले शिवसैनिक पाहून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. यावेळी शिवसेनेचे आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर हेदेखील उपस्थित झाले होते. ही घटना महापालिका आयुक्तापर्यंत पोहोचल्याने त्यांनी रात्री उशिरा धाव घेत येथील प्रकाराची माहिती घेतली. बदल झालेले केंद्र आणि खोल्यांची माहिती देण्यासाठी विलंब झाल्याने हा प्रकार घडल्याचे अधिकार यांनी सांगितले. प्रभाग २० मधील केएनकेला शाळेतील मतदान केंद्र हे नेहरुनगर येथील केंद्रीय विद्यालयात हलविण्यात आले. त्यामुळे मतदारांना तेथे जावे लागणार आहे.

बूथ बदलल्यामुळे उमेदवारांमध्ये संशय
मतदानाच्या एक-दाेन दिवस अाधीच पूर्वी निश्चित केलेल्यांपैकी काही बूथच बदलण्यात अाल्याने उमेदवार अाणि संबंधित राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले अाहे. शिवसेनेच्या उमेदवारांनी याबाबत अाक्षेप घेत भाजपने अापल्या साेयीने ही व्यवस्था बदलल्याचा अाराेप केला.
 
मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पाेहोचविण्यासाठी बहुतांश उमेदवारांनी घराेघरी स्लिप पाेहोचविण्याची व्यवस्था केली. मतदानाच्या तीन दिवस अाधीच स्लिप वाटपाचे काम सुरू हाेते. परंतु, एेन निवडणुकीच्या ताेंडावर शहरातील काही बूथच बदलण्यात अाले अाहेत. नाशिकराेड परिसरात तब्बल ३१ बूथ बदलण्यात अाले आहेत. काही तांत्रिक कारणास्तव हे बूथ बदलण्यात अाले असून, मतदारांपर्यंत ही माहिती पाेहोचविली जाईल, अशी ग्वाही महापालिका प्रशासनाने दिली अाहे. मात्र, त्यामुळे उमेदवारांसह त्यांच्या राजकीय पक्षामध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले अाहे.
 

राज्यातील सत्ताधारी भाजपने जाणीवपूर्वक हे बूथ बदलल्याचा अाराेप करण्यात अाला अाहे. ज्या ठिकाणी भाजपचा प्रभाव कमी त्या ठिकाणचे बूथ बदलून मतदान कमी करण्याचा प्रयत्न हाेत असल्याचा अाराेप करण्यात अाला अाहे. प्रशासनाने मात्र अाराेप खाेडून काढत ज्या मतदारांचे बूथ बदलले त्यांना पुन्हा स्लिप पाठवून माहिती दिली जाईल, असे म्हटले अाहे.

१८ हजार २०० मतदारांचा गोंधळ
ऑनलाइन आणि इ-गव्हर्नन्स करण्यासाठी राज्यशासनाने पाऊल टाकले आहे. मात्र, अधिकारी आणि कर्मचारी  हे अद्यापही पूर्वीच्याच पद्धतीने कामकाज करत असल्याने त्याचा फटका हा प्रभाग २० मधील सुमारे १८ हजार २०० मतदारांना बसण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...